सोलापुरात अमित शहांच्या स्वागताचे पोस्टर हटविले; धनंजय महाडिकही डेरेदाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 17:02 IST2019-09-01T16:45:08+5:302019-09-01T17:02:21+5:30
भाजपाने राष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्षप्रवेश देण्याचे आरंभले आहे.

सोलापुरात अमित शहांच्या स्वागताचे पोस्टर हटविले; धनंजय महाडिकही डेरेदाखल
सोलापूर : राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक जवळपास 2 हजार कार्यकर्त्यांसह सोलापुरच्या पुळूजमध्ये दाखल झाले असून आज भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश होणार आहे. या पार्श्वभुमीवर सोलापुरात शहांच्या स्वागताचे पोस्टर झळकले होते.
भाजपाने राष्ट्रवादीच्या नेत्यांना पक्षप्रवेश देण्याचे आरंभले आहे. यामुळे भाजपात जोरदार इन्कमिंग सुरू असून कोल्हापुरातल महाडिक गटही आज भाजपाच्या कंपूमध्ये दाखल होणार आहे. अमित शहा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज सोलापुरात असून सुमारे २००० कार्यकर्त्यांसह धनंजय महाडिक आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.
धनंजय महाडिक सहकुटुंब पोहोचले असून कोल्हापुरातील ताराराणी आघाडीचे १९, भाजपचे १३ नगरसेवक तसेच झेडपी सदस्यही त्यांच्यासोबत आहेत. तसेच जवळपास 4 हजार कार्यकर्ते सोलापूरकडे रवाना झाल्याचे समजते. दरम्यान अमित शहा यांच्या दौऱ्यासाठी बॅनरबाजी करण्यात आली होती. याविरोधात महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करत बॅनरच हटविले आहेत.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोलापुरात दाखल झाले असून त्यांच्यास्वागतासाठी शिक्षण मंत्री आशिष शेलार विनोद तावडे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.