Solapur Crime: बार्शी येथील व्यापारी पवन श्रीश्रीमाळ यांना घरात जाऊन ८ कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास अपहरण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल दाखल झाला आहे. त्यातील तिघांना अटक केली आहे. ही घटना १२ फेब्रुवारी रोजी घडली आहे.
याबाबत व्यापारी पवन संजय श्रीश्रीमाळ (रा. बालाजी कॉलनी, बार्शी) यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी आकाश कानू बरडे (वय १९, रा. परांडा रोड, बार्शी), अजिंक्य टोणपे (रा. भोसे चाकण, पुणे), दक्ष पांडे (रा. मोरे वस्ती, साने चौक, पुणे) यांच्यासह पाच जणांविरुद्ध बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांची सतर्कता व यंत्रणेमुळे डाव उधळला
फिर्यादीला अनोळखी व्यक्तीचा फोन येऊन शेंगदाणा व्यापारी म्हणून भेटण्यास बोलावले. पण त्यांनी संशय आल्याने नकारात्मक भूमिका घेतली. तरीही सतत फोन येत राहिले. त्यानंतर दोघेजण एमएसईबीचे कर्मचारी असल्याचे सांगून घरात येण्याचा प्रयत्न करताना त्याबाबत संशय आल्याने अडवताच निघून गेले. ही घटना फिर्यादीच्या मित्रांना समजताच त्यांनी एका वाहनातून पाठलाग करून याची माहिती पोलिसांना कळवली.पोलिसांनीही तातडीने तपास सुरू करून एका संशयितांची चौकशी करताना पुण्यातील इतरांनी मिळून हा मोठा कट रचल्याचे उघड झाले. ही टोळी गेल्या एक महिन्यापासून फिर्यादीच्या रोजच्या हालचालींचे निरीक्षण करून अपहरणाची संधी शोधत होती. या कटानुसार श्रीश्रीमाळ यांचे अपहरण करून ८ कोटी खंडणी मागण्याचा व ठार मारण्याचा प्रयत्न होता. परंतु, श्रीश्रीमाळ यांच्या सतर्कतेमुळे व पोलिसांच्या यंत्रणेमुळे डाव उधळला गेला.
एकाला कोठडी, दोघांना बालन्यायालयात केले हजरतपास अधिकारी पोसई उमाकांत कुंजीर तपास करताना आकाश बरडे या आरोपीला अटक करून त्याला बार्शी न्यायालयात न्यायाधीश राऊत यांच्यासमोर उभे केले. त्याला १७ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे तर यातील अजिंक्य टोनपे व दक्ष पांडे हे दोघे पळून गेले आहेत. अन्य दोघे विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याने त्यांना सोलापूर बालन्यायालयात हजर करण्यात आले.