तरुणाने कॉलेजवरून उडी मारून संपवलं जीवन; खिशातील चिठ्ठीतून धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 15:53 IST2025-03-18T15:53:45+5:302025-03-18T15:53:55+5:30
आई-वडिलांनी कॉलेजमध्ये जाऊन शोध घेतल्यावर त्यांना नवीन इमारतीवरून कोणीतरी पडल्याची माहिती मिळाली.

तरुणाने कॉलेजवरून उडी मारून संपवलं जीवन; खिशातील चिठ्ठीतून धक्कादायक खुलासा
Solapur Student Suicide : दयानंद कॉलेजमधील नवीन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थ्याने आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी सायंकाळी ४:२० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. कॉलेजमध्ये असाइनमेंट देण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मोबाइल स्विच ऑफ लागल्याने आई-वडिलांनी शोध घेतला. प्रीतम नीलेश राऊत (वय २२, रा. सोलापूर सहकारी बँकेच्या वरच्या मजल्यावर, टिळक चौक, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रीतम हा डी.बी.एफ. दयानंद महाविद्यालयात एमकॉमच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याचवेळी सावरकर मैदानासमोरील एका कॉम्प्युटर सेंटरमध्ये नोकरी करीत होता. सोमवारी सकाळी तो तयार झाला आणि आईला कॉलेजमध्ये असाइनमेंट द्यायची आहे, असे सांगून घरातून बाहेर पडला. तो सायकलवर कॉलेजमध्ये गेला. दुपारी त्याचे वडील घरी आले, त्यांनी पत्नीला मुलगा प्रीतम कोठे गेला? अशी विचारणा केली. कॉलेजला गेल्याचे सांगितल्यावर त्यांनी मोबाइलवरून संपर्क साधला. मात्र तो स्विच ऑफ लागला. वडिलांना चिंता वाटल्यांनी ते कॉम्प्युटर सेंटरच्या ठिकाणी गेले. तेथेही आला नसल्याचे सांगण्यात आले.
आई-वडिलांनी कॉलेजमध्ये जाऊन शोध घेतल्यावर त्यांना नवीन इमारतीवरून कोणीतरी पडल्याची माहिती मिळाली. दोघेही घटनास्थळाकडे गेले असता, त्या ठिकाणी त्यांचा मुलगा प्रीतम असल्याचे आढळून आले.
'आय वॉन्ट फ्रीडम...' असा उल्लेख असलेली चिठ्ठी सापडली
प्रीतम राऊत याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्याजवळ एक चिठ्ठी आढळून आली. चिठ्ठीमध्ये त्याने माझ्या कृत्याला मी स्वतः जबाबदार आहे. मी जी काही पैशाची उसनवारी केली आहे, ती त्यांना परत करावी. मी माझ्या आई- वडिलांची, नातेवाईकांची व मित्रांची माफी मागतो. आय वॉन्ट फ्रिडम... अशा आशयाची चिठ्ठी पोलिसांना मिळाल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी दिली.
प्रीतम-प्रतीक जुळे भाऊ
प्रीतम याच्या पश्चात आई, वडील व एक जुळा भाऊ प्रतीक असा परिवार आहे. त्याचे वडील नीलेश हे विकास बँकेत शिपाई म्हणून काम करतात. आई गृहिणी असून भाऊ प्रतिक हा बीए-३ या वर्गात शिकत आहे.
पगार कमी असताना सांगितला जास्त
प्रीतम हा एका कॉम्प्युटरमध्ये कामाला होता. त्या ठिकाणी तो १३ हजार रुपये पगार आहे, असे आईवडिलांना सांगत होता. मात्र पगार वेळेवर होत नाही, असे तो वडिलांना सांगत असे. मी तुला महिन्याला १३ हजार देतो नाराज होऊ नको म्हणून वडिलांनी प्रत्येक महिन्याला तीन महिने १३ हजार रुपये दिले होते. मात्र त्याला प्रत्यक्षात फक्त पाच हजार पगार होतो हे नंतर समजल्याचे वडील नीलेश यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.