सोलापूरच्या १५ एसआरपीएफ पोलीसांना ‘कोरोना’ ची लागण; मुंबईत उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 12:04 IST2020-05-21T11:38:17+5:302020-05-21T12:04:37+5:30
मुंबईमधील मातोश्री निवासस्थानी बंदोबस्तावरील पोलीसांचा समावेश

सोलापूरच्या १५ एसआरपीएफ पोलीसांना ‘कोरोना’ ची लागण; मुंबईत उपचार सुरू
सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबई येथील मातोश्री निवासस्थानी बंदोबस्तासाठी असलेल्या सोलापूरच्या एसआरपीएफ (राज्य राखीव पोलीस दल-१०) च्या १५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर कलाना येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत. यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या १३ पोलिसांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती राज्य राखीव दलाचे समुपदेशक रामचंद्र केंडे यांनी दिली.
सोरेगाव येथील एसआरपी कॅम्प-१० मध्ये राज्य राखीव दलातील १२०० पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. कॅम्पमधील पोलिसांना महाराष्ट्रात ठिकठिकाणी फिक्स व तात्पुरत्या स्वरूपात बंदोबस्त दिला जातो. एसआरपी कॅम्प १० मधील २६७ पोलीस मुंबई येथे बंदोस्तासठी पाठवण्यात आले आहेत. यातील १०० पोलीस मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रीवर बंदोबस्तासाठी लावण्यात आले आहेत. यापूर्वी बंदोबस्तासाठी असलेल्या १३ पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर आयटीआय कॉलेजमध्ये उपचार सुरू होते.
१४ दिवसांनंतर १३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, याच दलातील ड्यूटीवर असलेल्या अन्य १५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. १५ जणांवर मुंबईतील कलाना येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तर अन्य ५० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. एसआरपी पोलिसांना ४५ दिवसांच्या फिक्स बंदोबस्तासाठी २६ एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री परिसरात बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले होते.
२६ एप्रिल रोजी गेलेल्या पोलीस कर्मचाºयांचा तेथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या बृहन्मुंबई पोलिसांशी संपर्क आला. संपर्कात सोलापूरच्या आठ एसआरपी पोलिसांना कोरोना व्हायरसची लागण झाली.