World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:58 IST2025-10-03T13:57:06+5:302025-10-03T13:58:00+5:30
World Smile Day: आज जागतिक हास्य दिनानिमित्त जाणून घेऊया गोष्ट अशा एका मुलाची ज्याने हसून नाव, प्रसिद्धी आणि पैसेही कमावले!

World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
आजच्या व्हायरल जगात कोणती गोष्ट लोकांच्या कधी पसंतीस पडेल माहीत नाही. सध्या कोणत्याही विनोदी व्हिडीओ किंवा रीलच्या शेवटी, तसेच मिम मटेरिअल म्हणून एका मुलाच्या चेहऱ्याचा आणि हसण्याचा वापर केला जातो. जे ऐकून आपल्यालाही हसू फुटतं. हा मुलगा कोण? अचानक एवढा प्रसिद्ध कसा झाला? ज्याच्या हास्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली, त्या मुलाबद्दल आज जागतिक हास्य दिनानिमित्त(World Smile Day 2025) जाणून घेऊ.
या मुलाचे नाव आहे नबील सब्ती. तो अल्जीरियामध्ये राहतो. २०१४ मध्ये त्याने एका गाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. मात्र गाणं सुरु करण्याआधी तो गाता गाता स्वतःच हसू लागला. त्याला पाहून परीक्षकही हसू लागले. तो पुन्हा पुन्हा गात होता आणि गाण्याच्या सुरुवातीलाच हसून हसून लोट पोट होत होता. त्याच्या हसण्याने परीक्षकही हसत सुटले आणि ती गाण्याची स्पर्धा न राहता हास्य जत्रा झाली. पण स्पर्धेला नियम संगीताशी संबंधित असल्याने त्याची निवड त्या स्पर्धेत झाला नाही, पण तो व्हिडीओ जेव्हा प्रकाशित झाला तेव्हा तो पाहुन प्रेक्षकांचेही हसू थांबेना. त्याचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आणि या व्हिडीओने कमी काळात विक्रमी व्ह्यूज कमावले. पण या मोबदल्यात त्याला मिळाले काय? तर...
टेक्नोलॉजी" नावाच्या मोरोक्कोमधील कंपनीने त्याच्या या हसऱ्या चेहऱ्यासाठी आणि लोकांचं लक्ष वेधून घेतल्याबद्दल त्याला तब्बल ३ मिलियन डॉलरचं बक्षीस दिलं...!
एक सर्वसामान्य मुलगा, ज्याची आर्थिक परिस्थिती बेताची होती, वडिलांच्या निधनानंतर घरची जबाबदारी अंगावर पडली होती, तोच मुलगा 'मिलियन डॉलर स्माईल'चे प्रतीक बनला.
हसण्याचे लाभ अनेक आहेत, पण आपण हसणेच विसरलो आहोत. शेवटचे दिलखुलास कधी हसलो होतो हे आठवून पहा. व्हिडीओ, रील पाहून येणारं हसू हे क्षणिक असतं, पण मित्र, नातेवाईक, भावंडं एकत्र येऊन जेव्हा आठवणीत रमतात आणि जुने किस्से आठवून डोळ्यांच्या कडा ओल्या होईपर्यंत हसतात, ते खरं हसू. ते आपल्या आयुष्यातून हरवले असेल तर नक्की शोधा. रडवण्यासाठी लोक आहेतच, हसवणारे लोक जोडा आणि हसतमुखाने आयुष्याच्या प्रत्येक स्थितीला सामोरे जा, काय सांगावं, एखादं मिलियन डॉलर बक्षीस आपलंही वाट बघत असेल तर...
पहा नबीलचा तो व्हायरल व्हिडीओ :