"टिप नको सर, फक्त रेटिंग द्या"; कष्टकरी बापाचा 'स्वाभिमान'; लेकाला सोबत घेऊन करतो डिलिव्हरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:29 IST2026-01-05T12:28:18+5:302026-01-05T12:29:35+5:30
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर अशीच एक हृदयस्पर्शी घटना व्हायरल होत आहे. ही गोष्ट आहे 'स्विगी'चा डिलिव्हरी पार्टनर अजयची, जो बाईकवर आपल्या लहान मुलाला सोबत घेऊन डिलिव्हरी करत होता.

"टिप नको सर, फक्त रेटिंग द्या"; कष्टकरी बापाचा 'स्वाभिमान'; लेकाला सोबत घेऊन करतो डिलिव्हरी
आपण अनेकदा डिलिव्हरी एप्सवरून जेवण मागवतो, पार्सल घेतो आणि दार बंद करतो. पण कधीकधी त्या दरवाजावर उभी असलेली व्यक्ती आपल्याला आयुष्याचा असा धडा शिकवून जाते, जो पुस्तकांमध्येही मिळत नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर अशीच एक हृदयस्पर्शी घटना व्हायरल होत आहे. ही गोष्ट आहे 'स्विगी'चा डिलिव्हरी पार्टनर अजयची, जो बाईकवर आपल्या लहान मुलाला सोबत घेऊन डिलिव्हरी करत होता.
विनीत के नावाच्या युजरने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की, त्याने 'स्विगी इन्स्टामार्ट'वरून काही सामान ऑर्डर केलं होतं. जेव्हा डिलिव्हरी पार्टनर अजय सामान घेऊन पोहोचला, तेव्हा विनीतने पाहिलं की त्याच्या बाईकवर एक लहान मुलगाही बसला आहे. एका वडिलांची ही मेहनत आणि संघर्ष पाहून विनीतचं मन भरून आले. त्याने आपल्या सवयीनुसार मदत म्हणून अजयला काही 'टिप' देण्याचा प्रयत्न केला. पण अजयने जे केले, त्याने सर्वांनाच चकित केले.
A Swiggy delivery person came to deliver some Instamart stuff today
— Vineeth K (@DealsDhamaka) January 4, 2026
While he was at the door, I realised that he had someone on his bike. When asked he said it was his kid.
I usually tip directly. He politely refused the tip. He just wanted good rating for his service… pic.twitter.com/31WI8zQH2e
अजयने अतिशय नम्रपणे पैसे घेण्यास नकार दिला आणि म्हणाला- "सर, मला टिप नको. जर तुम्ही माझ्या कामावर खूश असाल, तर फक्त एक चांगलं रेटिंग द्या." विनीतने सोशल मीडियावर लिहिलं की, कदाचित तो अजयचा स्वाभिमान होता ज्याने त्याला पैसे घेण्यापासून रोखलं. त्याला कोणाची दया किंवा भीक नको होती, तर आपल्या कष्टासाठी आदर हवा होता.
विनीत पुढे म्हणाला की, "जेव्हा मी त्या मुलाला बाईकवर पाहिलं, तेव्हा कदाचित माझ्यातील पिता जागा झाला होता, पण अजयने मला शिकवलं की मदतीचा अर्थ फक्त पैसे देणं असा होत नाही." ही पोस्ट आता व्हायरल झाली असून लोक अजयच्या जिद्दीला सलाम करत आहेत. एका युजरने लिहिलं, "आपल्याला टिप देण्याची संस्कृती जपण्याची गरज आहे, पण जर कोणी नकार दिला तर त्याच्या स्वाभिमानाचा आदर केला पाहिजे."