Video: मंदिराबाहेर यूट्यूबरने मागितली भीक, काही तासांतच कमावले हजारो रुपये, पाहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 20:01 IST2026-01-29T19:58:00+5:302026-01-29T20:01:34+5:30
व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Video: मंदिराबाहेर यूट्यूबरने मागितली भीक, काही तासांतच कमावले हजारो रुपये, पाहा व्हिडिओ
Viral Video:सोशल मीडियावर सध्या वेगवेगळे प्रयोग करून कमाई दाखवण्याचा ट्रेंड वाढतोय. कोणी रस्त्यावर वडा-पाव किंवा पाणीपुरी विकून दिवसाची कमाई दाखवतो, तर कोणी चहाच्या टपरीतून किती पैसे मिळतात याचा हिशेब मांडतो. अशातच, एका तरुणाने चक्क मंदिराबाहेर भीक मागण्याचा प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे, काही तासांत त्याने हजारोंची कमाई केली.
व्हिडीओमध्ये नेमके काय आहे?
या तरुणाने राजस्थानातील प्रसिद्ध खाटू श्याम मंदिर परिसरात भीक मागितली आणि मिळालेली कमाई दाखवून अनेकांना चकित केले. सुमारे 45 सेकंदांचा हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर @singh_kikki या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये संबंधित तरुण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभा राहून सांगतो की, मंदिराबाहेर भीक मागितल्यास किती पैसे मिळू शकतात, हे आज पाहायचे आहे.
इनफ्लुएंसर: आज मैं देखूंगा खाटू श्याम मंदिर के बाहर भीख मांग कर कितने रुपए मिल सकते हैं
— Kikki Singh (@singh_kikki) January 28, 2026
फिर कुछ ही घंटे में उसने 4500 हजार रुपए इकट्ठा कर लिए pic.twitter.com/AZwtrnoICB
तो पुढे सांगतो की, गरीब दिसावे म्हणून त्याच्या मित्रांनी मुद्दाम त्याचे कपडे फाडले. त्यानंतर तो कधी उभा राहून तर कधी एका ठिकाणी बसून भाविकांकडे भीक मागताना दिसतो. काही जण 10 रुपये देतात, तर काही भाविक थेट 500 रुपयांची नोटही देतात.
स्वतःच आश्चर्यचकित
व्हिडीओदरम्यान तो तरुण वारंवार आश्चर्य व्यक्त करताना दिसतो. लोक खरंच पैसे देत आहेत, यावर विश्वास बसत नाही. आनंदात तो सतत सांगतो की, हा प्रयोग काम करत आहे. व्हिडीओच्या शेवटी तो दिवसअखेरची कमाई सांगतो आणि स्वतःच चकित होतो. अवघ्या काही तासांत 4,500 रुपये मिळाल्याचा दावा तो व्हिडिओत करतो.
सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया
हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. काही युजर्स चकित झाले असून, इतक्या सहज 4,500 रुपये मिळू शकतात यावर त्यांनी विश्वास व्यक्त केला. काहींनी हिशेब लावत लिहिले की, जर रोज 4,500 रुपये मिळाले, तर महिन्याला सुमारे 1.35 लाख रुपये आणि वर्षाला जवळपास 16 लाख रुपये कमावता येतील. मात्र अनेकांनी या व्हिडीओवर शंका उपस्थित केली. काहींच्या मते हा व्हिडीओ स्क्रिप्टेड किंवा बनावट असू शकतो.
काही युजर्सनी प्रश्न विचारला की, खाटू श्याम मंदिर परिसरात गुजराती भाषेतील फलक कसे दिसतात? तर काहींनी उपरोधिक टिप्पणी करत लिहिले की, असे व्हिडीओ पाहता देशात भीक मागण्यावर बंदी घालावी लागेल. दरम्यान, हा व्हिडीओ खरा की बनावट, याबाबत निश्चित माहिती समोर आलेली नसली, तरी या घटनेमुळे सोशल मीडियावर भीक मागणे, धार्मिक स्थळांवरील दानसंस्कृती आणि व्हायरल कंटेंटसाठी केले जाणारे प्रयोग यावर नवी चर्चा सुरू झाली आहे.