Father Jump In Sea : प्रत्येक बाबा हा लेकरांचा पहिला हीरो असतो. आपल्या बाळासाठी आई-बाबा अगदी काहीही करायला तत्पर असतात. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चिमुकली मुलगी समुद्रात पडल्याने, मागचा पुढचा कोणताही विचार न करता तिच्या पित्याने थेट पाण्यात उडी मारली. ही बाप-लेकीची जोडी डिस्ने क्रूझवर प्रवास करत होती. या दरम्यान हा प्रसंग घडला.
सदरची घटना 'डिस्ने ड्रीम' नावाच्या मोठ्या जहाजावर घडली आहे. हे जहाज बहामासमधून दक्षिण फ्लोरिडाला जात होते. हे जहाज वेगाने पुढे जात होते. दरम्यान, क्रूझवर खेळता खेळता ५ वर्षांची चिमुकली अचानक समुद्रात पडली. बाबाचं आपल्या लेकीकडे लक्ष जाताच त्याने कसलाही विचार न करता सरळ पाण्यात उडी मारली. ही घटना बघताना सगळ्यांच्याच जीवाचा थरकाप होत होता. या जहाजाच्या कॅप्टनने जहाजाची दिशा या बाप-लेकीच्या दिशेने फिरवली आणि रेस्क्यू बोट पाठवून दोघांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला.
पाहा व्हिडीओ :
क्रूझवर असलेल्या इतर प्रवाशांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ चित्रित केला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पित्याने आपल्या लेकीला वाचवले आहे. इतक्यात रेस्क्यू बोट त्यांच्याजवळ पोहोचते. रेस्क्यू बोट जवळ आल्यानंतर बाबाने आपल्या लेकीला पहिलं सुखरूप बोटीवर सोडलं. यानंतर बाबा देखील रेस्क्यू बोटीत आला. दोघांना सुखरूप पाहून इतर प्रवाशांनी एकच जल्लोष केला. या घटनेदरम्यान इतर प्रवाशी बाप-लेकीच्या जोडीसाठी प्रार्थना करत होते.
क्रूझ लाइनने केले टीमचे कौतुक!डिस्ने क्रूझ लाइनने एका निवेदनात त्यांच्या टीमचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, आमच्या क्रू मेंबर्सनी दाखवलेल्या त्यांच्या असाधारण क्षमता आणि जलद कृतीबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो. यामुळे दोन्ही पाहुणे काही मिनिटांतच सुरक्षितपणे जहाजावर परत आले.