Viral : ऑफिसमध्ये पाऊल ठेवले अन् तासाभरात राजीनामा! कंपनीचा लॅपटॉप हातात येताच कर्मचाऱ्याचा गेम बदलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 10:53 IST2026-03-06T10:51:39+5:302026-03-06T10:53:00+5:30
सध्या सोशल मीडियावर एका अशा कर्मचाऱ्याची चर्चा रंगली आहे, ज्याने चक्क नोकरीच्या पहिल्याच दिवशी राजीनामा देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

AI Generated Image
कॉर्पोरेट विश्वात रोज नवनवीन आणि अजब किस्से ऐकायला मिळतात. पण सध्या सोशल मीडियावर एका अशा कर्मचाऱ्याची चर्चा रंगली आहे, ज्याने चक्क नोकरीच्या पहिल्याच दिवशी राजीनामा देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कंपनीने दिलेला लॅपटॉप हातात मिळताच या बहाद्दराचा मूड बदलला आणि त्याने थेट घरचा रस्ता धरला. एका महिला एचआर प्रोफेशनलने शेअर केलेली ही कैफियत सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
दोन महिने वाट पाहिली अन् पहिल्याच दिवशी झटका!
नायजेरियातील एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या एचआर प्रोफेशनलने एक्सवर आपली व्यथा मांडली. त्यांनी एका तगड्या उमेदवाराची निवड केली होती. हा उमेदवार कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने टीमने तब्बल दोन महिने त्याच्या जॉइनिंगची वाट पाहिली. अखेर तो दिवस उजाडला आणि उमेदवार ऑफिसमध्ये हजर झाला. मात्र, खरी नाटकं ऑनबोर्डिंग प्रक्रियेवेळी सुरू झाली.
लॅपटॉपवरून रंगलं महाभारत
नियमानुसार, एचआरने जेव्हा या नवीन कर्मचाऱ्याला कामासाठी कंपनीचा अधिकृत लॅपटॉप दिला, तेव्हा त्याने तो घेण्यास स्पष्ट नकार दिला. "मला कंपनीचा लॅपटॉप नको, मी माझ्या पर्सनल लॅपटॉपवरच काम करेन," असा हट्ट त्याने धरला. कंपनीच्या पॉलिसीनुसार सुरक्षेच्या कारणास्तव ऑफिसचाच लॅपटॉप वापरणे बंधनकारक असल्याने एचआरने त्याची विनंती धुडकावून लावली. नाईलाजाने त्याने लॅपटॉप स्वीकारला, पण त्याचा चेहरा पडला होता.
घरून काम की डबल गेम?
दिवस संपता संपता हा कर्मचारी पुन्हा एचआरकडे गेला आणि म्हणाला, "मी एकावेळी दोन लॅपटॉप घरी नेऊ शकत नाही, त्यामुळे हा लॅपटॉप मी ऑफिसमध्येच ठेवतोय." त्याने लॅपटॉप तिथेच जमा केला आणि निघून गेला. पण खरी गोम त्याच संध्याकाळी समोर आली, जेव्हा त्याने मेसेज करून आपण ही नोकरी करणार नसल्याचे कळवले.
नेटकऱ्यांचा संशय: 'मूनलायटिंग'चा प्रकार?
एचआरने आपल्या पोस्टमध्ये असा अंदाज वर्तवला आहे की, कदाचित या कर्मचाऱ्याने आपली जुनी नोकरी सोडली नसावी. तो एकाच वेळी दोन कंपन्यांमध्ये काम करण्याचा प्लॅन आखत होता. जर तो कंपनीचा लॅपटॉप घरी घेऊन गेला असता, तर घरातील दोन लॅपटॉपमुळे त्याचे बिंग फुटले असते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सोशल मीडियावर यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. "आजकाल लोक पैसे कमावण्यासाठी काय काय शक्कल लढवतात," अशी टिप्पणी एका युजरने केली, तर काहींनी कंपन्यांनी बॅकग्राउंड चेक अधिक कडक करण्याची गरज व्यक्त केली आहे.