रात्री ११:४५ वाजता, चेन तुटली, अंधारामुळे 'ती' घाबरली; तरुणीसोबत रॅपिडो रायडरने केलं 'असं' काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 14:16 IST2025-11-27T14:14:55+5:302025-11-27T14:16:04+5:30
Video - एका तरुणीने बंगळुरूमध्ये तिच्यासोबत घडलेली एक घटना शेअर केली आहे.

रात्री ११:४५ वाजता, चेन तुटली, अंधारामुळे 'ती' घाबरली; तरुणीसोबत रॅपिडो रायडरने केलं 'असं' काही...
एका तरुणीने बंगळुरूमध्ये तिच्यासोबत घडलेली एक घटना शेअर केली आहे. आशा माने असं या तरुणीचं नाव आहे. रात्री ११:४५ वाजले होते, फोनची फक्त ६% बॅटरी शिल्लक होती, तिने घरी जाण्यासाठी रॅपिडो बाईक बूक केली. तिला ३८ किलोमीटरचा प्रवास करायचा होता. काही मिनिटांनंतर पिवळ्या रंगाचं जॅकेट घातलेला रॅपिडो रायडर तिच्यासमोर बाईक घेऊन आला.
आशा म्हणाली, "मला लवकर घरी पोहोचायचं आहे." रायडरने उत्तर दिलं, "नक्कीच, मॅडम, काळजी करू नका" आणि प्रवास सुरू झाला. पण हा प्रवास करताना बाईकची चेन तुटली आणि बाईक थांबली. आजुबाजूला रस्त्यावर कोणीच नव्हतं. फोनमध्ये ६% बॅटरी होती, सगळीकडे अंधार होता. हा क्षण कोणत्याही मुलीसाठी भयानक असू शकतो.
आशाला वाटलं की, आता राईड कॅन्सल होईल आणि अंधारात ती एकटी पडेल, ती घाबरली. पण रॅपिडो रायडरने असं काही केलं जे तिला अपेक्षित नव्हतं. "काळजी करू नकोस, आपण हे दुरुस्त करू. मी तुला घरी सोडतो" असं तो आशाला म्हणाला. रस्त्याच्या कडेला बसून, आशाने तिच्या फोनचा टॉर्च चालू केला. त्याने चेन दुरुस्त करायला सुरुवात केली. शांतपणे काम करण्याचा प्रयत्न होता.
आशा म्हणाली "कोणतीही तक्रार नाही, राग नाही... फक्त दोन अनोळखी लोक मध्यरात्री एकत्र काम करत होते, एकमेकांवर विश्वास ठेवत होते." १० मिनिटांनंतर, बाईक पुन्हा चालू झाली. कॅप्टन उठला हात धुवून हसत म्हणाला, "चला जाऊया मॅडम. तुम्हाला घरी जायचं आहे." त्याने आपलं वचन पाळल. रात्री १ वाजेपर्यंत आशा सुरक्षितपणे घरी पोहोचली. आशाने संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. सर्व पुरुष सारखे नसतात असंही सांगितलं.