VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 21:23 IST2025-12-24T21:22:23+5:302025-12-24T21:23:07+5:30
Train Fight Viral video: धावत्या ट्रेनमध्ये ते लोक एकमेकांवर तुटून पडताना दिसले

VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
Train Fight Viral video: भारतीय रेल्वेने प्रवास करताना अनेकदा जागा पकडण्यावरून किंवा इतर कारणांमुळे प्रवाशांमध्ये शाब्दिक चकमक उडताना आपण पाहतो. मात्र, उत्तर प्रदेशातील वाराणसी ते लखनौ दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांनी सर्व मर्यादा ओलांडल्याचे समोर आले. सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रवाशांचा एक गट धावत्या ट्रेनमध्ये एकमेकांवर तुटून पडताना दिसत आहे.
काय आहे नेमकी घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ वाराणसी-लखनौ इंटरसिटी एक्सप्रेसमधील आहे. हा वाद अमेठी स्थानकाच्या आसपास झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, काही प्रवासी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत आहेत. कोचमध्ये अगदी 'WWE' कुस्तीप्रमाणे दोन गट आपापसात भिडले असून, इतर प्रवासी घाबरून बाजूला सरकलेले दिसत आहेत.
Inside Varanasi-Lucknow intercity train near Amethi in UP. pic.twitter.com/KlRvwC74TU
— Piyush Rai (@Benarasiyaa) December 24, 2025
वादाचे कारण अद्याप अस्पष्ट
या भीषण मारहाणीमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, रेल्वेच्या जनरल डब्यात बसण्याच्या जागेवरून किंवा पाय लागल्याच्या कारणावरून हा वाद विकोपाला गेला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा व्हिडिओ पत्रकार पीयूष राय यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून शेअर केला आहे.
रेल्वे प्रशासनासमोर आव्हान
ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ (RPF) तैनात असते, तरीही अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी मारहाण होणे चिंतेची बाब आहे. या व्हिडिओने प्रवाशांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अद्याप याप्रकरणी रेल्वे पोलीस किंवा प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही, मात्र व्हिडिओच्या आधारे मारहाण करणाऱ्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.
सध्या हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत असून, नेटकरी या घटनेवर संताप व्यक्त करत आहेत. "सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे वर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हायला हवी," अशी मागणी जोर धरत आहे.