नव्याने उभारलेला चीनमधील सर्वात उंच पूल कोसळला; पाहा धक्कादायक Video...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 14:44 IST2025-11-12T14:43:29+5:302025-11-12T14:44:32+5:30
मंगळवारी दुपारी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

नव्याने उभारलेला चीनमधील सर्वात उंच पूल कोसळला; पाहा धक्कादायक Video...
China News: चीनच्या दक्षिण-पश्चिमेकडील सिचुआन प्रांतात नुकताच उद्घाटन झालेला ‘होंगची पूल’ (Hongqi Bridge) भीषण भूस्खलनाच्या तडाख्यात कोसळला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून, प्राथमिक तपासात भूस्खलन हेच अपघाताचे मुख्य कारण असल्याचे निष्पन्न झाले आहे.
758 मीटर लांबीचा पूल क्षणात कोसळला
ही घटना मंगळवारी दुपारी घडली. भूस्खलनाने पुलाचा एक मोठा भाग गिळंकृत केला आणि काही क्षणांतच पूल कोसळून नदीत पडला. सिचुआनमधील हा पूल सुमारे 758 मीटर लांबीचा होता आणि मध्य चीनला तिबेटशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा एक महत्त्वाचा दुवा मानला जात होता. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की, प्रचंड प्रमाणात झालेल्या भूस्खलनामुळे पुलाचे खांब काही सेकंदात नदीत कोसळलात.
JUST IN: 🇨🇳 Hongqi bridge collapses in southwest China, months after opening. pic.twitter.com/EK3YcWEjUy
— BRICS News (@BRICSinfo) November 11, 2025
एक दिवस आधीच दिला होता इशारा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्थानिक प्रशासनाने सोमवारीच पुलावरील वाहतूक बंद केली होती. परिसरातील टेकड्यांमध्ये भेगा व जमिनीतील हालचाल वाढळल्यामुळे हा निर्णय घेतला गेला होता. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक थांबवली होती, मात्र मंगळवारी दुपारी भूस्खलनाची तीव्रता अचानक वाढली, ज्यामुळे पुल कोसळला.
स्थानिक प्रशासनाची तपासणी सुरू
या घटनेनंतर सोशल मीडियावर लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या. काहींनी बांधकामाच्या वेगावर नव्हे तर गुणवत्तेवर लक्ष द्या, असा सल्ला दिला, तर काहींनी, हा अपघात पूर्णपणे पुलाच्या दोषामुळे नाही, तर भूस्खलनामुळे झाल्याचे म्हटले. प्राथमिक तपासणीत असे दिसून आले आहे की, या परिसरातील भूगर्भीय अस्थिरता ही मुख्य कारणांपैकी एक आहे.