Video - अरे बापरे! स्विगी इन्स्टामार्टवरून ऑर्डर केलं सोन्याचं नाणं; पॅकेटमध्ये निघाला १ रुपया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 12:30 IST2025-12-10T12:29:26+5:302025-12-10T12:30:19+5:30
तुम्ही हजारो रुपये खर्च करून सोनं मागवलं आणि पॅकेटमध्ये अवघ्या 'एक रुपयाचं' नाणं मिळालं तर काय होईल? धक्का बसेल ना... असंच काहीसं एका तरुणासोबत घडलं आहे.

Video - अरे बापरे! स्विगी इन्स्टामार्टवरून ऑर्डर केलं सोन्याचं नाणं; पॅकेटमध्ये निघाला १ रुपया
सणासुदीचा काळ असो वा गुंतवणुकीचा विषय, भारतात सोन्याबद्दलची आवड कधीच कमी होत नाही. आता तर तंत्रज्ञान इतकं पुढे गेलं आहे की तुम्ही घरबसल्या भाजीपाल्याप्रमाणे १० मिनिटांत सोन्याचं नाणं देखील मागवू शकता. पण, तुम्ही हजारो रुपये खर्च करून सोनं मागवलं आणि पॅकेटमध्ये अवघ्या 'एक रुपयाचं' नाणं मिळालं तर काय होईल? धक्का बसेल ना... असंच काहीसं एका तरुणासोबत घडलं आहे.
अंकित दिवान याच्यासोबत अशीच हैराण करणारी घटना घडली आहे. स्विगी इ्न्स्टामार्टवरून ५ ग्रॅम सोन्याचं नाणं ऑर्डर करण्याचा त्यांचा अनुभव आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. बंगळूरुमध्ये राहणाऱ्या अंकितने ज्वेलरी शॉपमध्ये जाण्याऐवजी क्विक कॉमर्स एपचा विचार केला. त्यान 'स्विगी इन्स्टामार्ट'वरून ५ ग्रॅम सोन्याचं नाणं ऑर्डर केलं. डिलिव्हरी बॉय वेळेवर पॅकेट घेऊन पोहोचला. पण, खरी गोष्ट तेव्हा सुरू झाली जेव्हा अंकितने डिलिव्हरी पार्टनरसमोरच पॅकेट उघडलं.
Just got a 1 rupee coin instead of 5g Gold Coin from @SwiggyInstamart . While the order has been cancelled, and I have got my money back, the delivery partner was ready to cry.
— Ankit Dewan (@ankitdewan) December 9, 2025
The whole opening was captured on a video. I hope they are fair with the partner.
Please be careful… pic.twitter.com/iYYHtvsy0k
सीलबंद पॅकेटच्या आतून जे काही निघालं, ते पाहून दोघांनाही मोठा धक्का बसला. तिथे चमकणारं सोन्याचं नाणं नव्हतं, तर एक रुपयाचं नाणं ठेवलेलं होतं. अंकितने दिलेल्या माहितीनुसार, जशी ही फसवणूकसमोर आली, तसा डिलिव्हरी बॉय घाबरला. अंकितने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "मला माझे पैसे परत मिळाले आहेत आणि ऑर्डर रद्द झाली आहे, पण तो डिलिव्हरी पार्टनर अक्षरश: रडायला आला होता."
Ordered Gold Coin from @SwiggyInstamart and got Re 1 Coin !!! 🤯🤯
— Akash (@ccg33k) December 9, 2025
Good move from @ankitdewan that he captured it on video and didn't share otp without validating.
Listen with 🔊on - its so funny !! 🤣pic.twitter.com/ieMuL0ZxId
ही घटना दर्शवते की, ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये अनेकदा सर्वात जास्त भीती आणि दबाव त्या रोजंदारीवर काम करणाऱ्या डिलिव्हरी एजंट्सवर असतो, ज्यांचा या घोटाळ्याशी कदाचित काहीही संबंध नसतो. कंपनी किंवा ग्राहक आपल्यावर याचा आरोप करेल, अशी भीती त्यांना असते. अंकितने हुशारी दाखवत पॅकेट उघडतानाचा संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड केला होता.
अंकितने 'ओटीपी' देण्यापूर्वी पॅकेटची तपासणी करून घेतली होती. त्याने सोशल मीडियावर लोकांना सावध करताना लिहिलं आहे की, "कृपया सर्वजण सावध राहा! पॅकेट तपासल्याशिवाय कधीही ओटीपी (OTP) देऊ नका." स्विगीने या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन अंकित यांना रिफंड दिला आहे. कंपनीने डिलिव्हरी पार्टनरसोबतही न्याय करावा आणि त्याला त्रास देऊ नये, अशी आशा अंकित यांनी व्यक्त केली आहे.