रेल्वे अधिकाऱ्यांची भीती खरी ठरली! स्लीपर वंदे भारत खराब केली, प्रवाशांनी सीटवर टाकला कचरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:03 IST2026-01-22T13:02:28+5:302026-01-22T13:03:58+5:30
Sleeper Vande Bharat Train News: रेल्वेमध्ये स्वच्छता ठेवणे हे प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे भारतीय रेल्वेने स्पष्ट केले आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांची भीती खरी ठरली! स्लीपर वंदे भारत खराब केली, प्रवाशांनी सीटवर टाकला कचरा
Sleeper Vande Bharat Train News: भारतीय रेल्वेने स्लीपर वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करून आणखी एक मोठा पल्ला गाठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाच्या पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण करण्यात आले. स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू होण्यापूर्वी रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली भीती खरी होताना पाहायला मिळाली. स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू होताच प्रवाशांनी खराब केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने स्लीपर वंदे भारत ट्रेनच्या लोकार्पणाआधी एक्सवर एक पोस्ट केली होती. “कृपया जर तुम्ही ‘टॉयलेट मॅनर्स’ शिकलेले असाल, तसेच वॉशरूमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करणार असाल, आणि तुम्हाला सार्वजनिक मालमत्तेबाबत आदर असेल तरच या ट्रेनने प्रवास करा. धन्यवाद!” अशी पोस्ट केली होती. यानंतर स्लीपर वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण झाल्यानंतर प्रवाशांनी बसल्या जागीच कचरा टाकल्याचे पाहायला मिळाले.
‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ सुरू होताच अस्वच्छ
भारतीय रेल्वेच्या कोणत्याही ट्रेनमध्ये अस्वच्छता, कचरा, पान खाऊन थुंकल्याच्या पिचकाऱ्या सामान्य गोष्ट आहे. मग ती राजधानी असो, शताब्दी असो, कोणतीही मेल, एक्सप्रेस या रेल्वे ट्रेनमध्ये बर्थपासून ते शौचालयांपर्यंत, सर्वत्र घाण, अस्वच्छता आढळणे ही एक सामान्य गोष्ट झालेली आहे. ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ही याला अपवाद ठरली नाही. रेल्वेने कितीही स्वच्छता, टापटीपपणा, नेटकेपणा ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी प्रवाशांच्या सवयी स्वच्छतेच्या आड येताना दिसतात. स्लीपर वंदे भारतमध्येही हाच अनुभव आल्याचे पाहायला मिळाला.
सोशल मीडियावर प्रचंड रोष
स्लीपर वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांना काही प्रवाशांनी प्रवास करताना वापरलेले चहाचे कप, कागद आणि रॅपर्स कचऱ्याच्या डब्यात न टाकता रेल्वेच्या कोचमध्ये बसल्या जागी टाकल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामुळे त्या प्रवाशांच्या वागण्यावर सोशल मीडियावर प्रचंड रोष व्यक्त होत आहे. ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ ही एक भारतीय रेल्वेची अत्याधुनिक रेल्वे मानली जाते. या ट्रेनमध्ये रेल्वे प्रशानसाकडून स्वच्छतेची चांगली काळजी घेतली जाते. ट्रेनमध्ये ठिकठिकाणी कचऱ्यासाठी डबे ठेवण्यात आले आहेत. स्वच्छतेची एवढी काळजी घेतली जात असतानाही काही प्रवाशांनी वस्तू वापरून झाल्यानंतर त्या तशाच बसल्या जागी फेकून दिल्या.
स्वच्छता ठेवणे हे प्रत्येक प्रवाशाचे कर्तव्य
‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’मधील अस्वच्छतेचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने याची दखल घेतली. यावर प्रतिक्रिया देताना रेल्वेतील एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, रेल्वे ही सार्वजनिक संपत्ती असल्याने तिथे स्वच्छता ठेवणे हे प्रत्येक प्रवाशाचे कर्तव्य आहे. तरीही काही प्रवाशांकडून ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’मध्ये असे कृत्य केले जात असेल तर तिथे तत्काळ स्वच्छतेसाठी ऑन-बोर्ड हाऊसकीपिंग कर्मचारी नेहमी उपलब्ध असतात.
दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, रेल्वेमध्ये अशा प्रकारचे वर्तन करणाऱ्यांवर लोकांनी जोरदार टीका केली. भारताला बाह्य शत्रूंची गरज नाही. आपण आपल्याच व्यवस्थांमध्ये तोडफोड करण्यास आणि त्या नष्ट करण्यास पूर्णपणे सक्षम आहोत, अशी प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिली.
🚨People litter on vande bharat Sleeper train within hours of its inaugural run.
— Indian Infra Report (@Indianinfoguide) January 18, 2026
Just see the civic sense pic.twitter.com/cCcvbJJWoL