पाणीपुरीचा मोठा घास घेण्याची चूक महागात; जबडा निखळल्याने महिलेचे तोंड राहिलं उघडंच, डॉक्टरांनी हात टेकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 16:14 IST2025-12-01T16:09:37+5:302025-12-01T16:14:09+5:30
पाणीपुरी खात असतानाच महिलेवर मोठी वैद्यकीय आपत्ती ओढवली.

पाणीपुरीचा मोठा घास घेण्याची चूक महागात; जबडा निखळल्याने महिलेचे तोंड राहिलं उघडंच, डॉक्टरांनी हात टेकले
Social Viral: पाणीपुरी हा भारतीय खाद्यप्रेमींचा अत्यंत आवडीचा पदार्थ. पण उत्तर प्रदेशच्या औरैया जिल्ह्यात गोलगप्पा खाण्याच्या नादात एका महिलेवर मोठी गंभीर परिस्थिती ओढवली आहे. मोठी पाणीपुरी तोंडात घालण्याच्या प्रयत्नात तिचा जबडा निखळला आणि तोंड उघडंच राहिलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, देशभरातील पाणीपुरीप्रेमींना यामुळे धक्का बसला आहे. ही वेदनादायक पण विचित्र घटना घडल्यानंतर संबंधित महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांनाही इतका गंभीर आणि वेगळा प्रकार पाहून आश्चर्य वाटले.
इंककला देवी (वय ५०) असे पीडित महिलेचे नाव आहे. त्या दिबियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरीकिशनपूर ककोर गावच्या रहिवासी आहेत. त्यांच्या नातेवाईक महिलेची प्रसूती होणार असल्याने कुटुंबासह त्या जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात थांबल्या होत्या. सकाळी मुलांना पाणीपुरी खाण्याची इच्छा झाली, त्यामुळे संपूर्ण कुटुंब जवळच्या हातगाडीवर गेले. सगळे जण पाणीपुरीचा आस्वाद घेत होते.
'कट' आवाज आला आणि...
इंककला देवी यांनी एक मोठी पाणीपुरी उचलली आणि ती एकाच वेळी तोंडात टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तोंड एकदम रुंद उघडले आणि पाणीपुरी तोंडात कोंबली.
जसे त्यांनी तोंड एकदम रुंद उघडले, तसा त्यांच्या जबड्यातून कट असा आवाज आला आणि त्यांचे तोंड जागेवरच जाम झाले. पाणीपुरी तोंडात अडकली आणि तोंड बंद होणे शक्यच झाले नाही.
डॉक्टरही झाले हतबल
इंककला देवी वेदनेने तडफडू लागल्या. सुरुवातीला नातेवाईकांना वाटले की त्या मस्करी करत आहेत, पण त्यांचे डोळे पाणावलेले पाहून सगळे घाबरले. त्यांच्या नातेवाईक सावित्री देवी यांनी सांगितले, आम्ही त्यांना उचलून धावत जिल्हा रुग्णालयात घेऊन गेलो. जिल्हा रुग्णालयातील डॉ. मनोज कुमार यांनी सांगितले की, महिलेचा जबडा पूर्णपणे निखळला होता. तो हाताने पूर्ववत करण्याचा त्यांनी अनेकदा प्रयत्न केला, पण यश मिळाले नाही. डॉक्टरांनी आपल्या वैद्यकीय आयुष्यात फक्त पाणीपुरी खाल्ल्याने जबडा निखळल्याचा असा प्रकार कधीही पाहिला नव्हता.
(पानी पूरी) गोलगप्पा खाना वाली महिलाओं के लिये जरुरी सूचना चटकारे लेकर गोलगप्पा खाना कहीं भारी न पड़ जाये औरैया जिले की घटना सामने आई है, जहां गोलगप्पा खाना एक महिला के लिए मुसीबत बन गया।का गोलगप्पा खाते समय अचानक जबड़ा उतर गया। #ImportantInformation#PaniPuri#Golgappa#Womanpic.twitter.com/lGn7w1Uxeu
— Puneet Pandey (@PuneetP78555204) December 1, 2025
जबड्यामुळे होत असलेल्या वेदनेची तीव्रता पाहून डॉक्टरांनी इंककला देवी यांना पुढील आणि विशेष उपचारांसाठी सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये हलवले आहे. इंककला देवी अजूनही पूर्णपणे बऱ्या झालेल्या नाहीत आणि त्यांना सतत वेदना होत आहेत.
डॉक्टरांनी या घटनेनंतर नागरिकांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. "ज्यांना जबड्यात आधीच वेदना आहेत, किंवा ज्यांचे तोंड पूर्ण उघडत नाही, अशा समस्या असलेल्या लोकांनी जबरदस्ती तोंड रुंद उघडू नये. मोठी पाणीपुरी, बर्गर किंवा इतर कोणतीही मोठी वस्तू एकदम तोंडात कोंबण्याचा प्रयत्न करू नका. असे केल्यास जबड्याचे हाड जागेवरून सरकते आणि खूप वेदना होतात."