जपानमधील साकुराजिमा ज्वालामुखीचा भीषण उद्रेक; 4.4 किमी उंच राखेचा ढग, 30 उड्डाणे रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:53 IST2025-11-18T13:52:37+5:302025-11-18T13:53:34+5:30
ज्वालामुखीतून रविवारी सलग तीन वेळा जोरदार उद्रेक झाला.

जपानमधील साकुराजिमा ज्वालामुखीचा भीषण उद्रेक; 4.4 किमी उंच राखेचा ढग, 30 उड्डाणे रद्द
Japan Volcano Eruption : जपानच्या क्यूशू बेटावर असलेल्या साकुराजिमा या सक्रिय ज्वालामुखीतून रविवारी सलग तीन वेळा जोरदार उद्रेक झाला. या उद्रेकातून उडालेला राख आणि धुराचा प्रचंड ढग तब्बल 4.4 किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचला. गेल्या 13 महिन्यांतील हा सर्वात उंच उद्रेक मानला जातोय. या परिस्थितीमुळे कागोशिमा विमानतळावरून 30 उड्डाणे रद्द करण्यात आली.
उद्रेक कधी झाला?
जपान हवामान विभागाने (JMA) दिलेल्या माहितीनुसार, साकुराजिमावर रविवारी तीन मोठे विस्फोट झाले.
पहिला उद्रेक : पहाटे 1 वाजता
दुसरा उद्रेक : सकाळी 2:30 वाजता
तिसरा उद्रेक : सकाळी 8:50 वाजता
Japan's Sakurajima volcano erupted multiple times on Sunday, sending a plume of smoke and ash more than 14,000 feet into the air. pic.twitter.com/zp09QIgcWL
— AccuWeather (@accuweather) November 17, 2025
या उद्रेकानंतर आकाशात काळ्या धुराचे प्रचंड ढग दाटून आले. 2019 मध्ये झालेल्या उद्रेकातून 5.5 किमी उंच राख फेकल्यापासून इतक्या उंचीचा उद्रेक पुन्हा झालेला नव्हता.
30 फ्लाइट रद्द
कागोशिमा आणि आसपासच्या क्षेत्रात राख पडण्याचा धोका वाढल्याने विमान सुरक्षेच्या दृष्टीने कागोशिमा विमानतळाने 30 उड्डाणे रद्द केली. यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
नागरिकांना इशारा
JMA च्या माहितीनुसार, राखेचे ढग ईशान्य दिशेने वाहत गेले असून, कागोशिमा शहर आणि मियाझाकी प्रांतात राख पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क व चष्मा लावण्याचा सल्ला दिला आहे. राखेमुळे डोळ्यांची जळजळ, श्वसनाचे त्रास होऊ शकतात. याशिवाय, रस्ते घसरडे होण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.
जपानमधील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखी
साकुराजिमा हा जपानमधील सर्वात सक्रिय ज्वालामुखींमध्ये गणला जातो. लहान-मोठे उद्रेक नियमित होत असतात. 1914 मधील मोठ्या उद्रेकात संपूर्ण बेट मुख्य भूभागाशी जोडले गेले होते. विशेष म्हणजे, जपान हा रिंग ऑफ फायर या भूकंप-ज्वालामुखी पट्ट्यात येत असल्यामुळे देशात ज्वालामुखींचे प्रमाण जास्त आहे. साकुराजिमा पर्यटनदृष्ट्याही लोकप्रिय आहे, पण उद्रेकाच्या काळात पाहणी क्षेत्र बंद ठेवले जाते.