कॉलेजमध्ये शिकताना रतन टाटा पडले होते प्रेमात; पण 'या' कारणासाठी मोडलं लग्न अन् नंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 18:39 IST2020-02-13T18:18:58+5:302020-02-13T18:39:21+5:30
रतन टाटा १० वर्षाचे होते त्यावेळी त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता.

कॉलेजमध्ये शिकताना रतन टाटा पडले होते प्रेमात; पण 'या' कारणासाठी मोडलं लग्न अन् नंतर...
मुंबई - टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांनी स्वत:च्या आयुष्यात घडलेल्या प्रेमाची गोष्ट शेअर केली आहे. ह्युमन्स ऑफ बॉम्बे या फेसबुकवर पोस्टवर टाटानं लिहिलं आहे की, लॉन्स एंजिल्समध्ये कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी एका आर्किटेक्चर कंपनीत नोकरी सुरु केली. १९६२ चा तो काळ खूप सुंदर होता. लॉन्स एंजिल्समध्ये माझं एकीवर प्रेम होतं. तिच्यासोबत लग्न जवळपास निश्चित झालं होतं. मात्र माझ्या आजीची तब्येत बिघडल्यानंतर मला भारतात परतावं लागलं असं ते म्हणाले.
मी जेव्हा भारतात आलो त्यावेळी माझं जिच्यावर प्रेम होतं तीदेखील माझ्यासोबत यावं असा विचार होता. पण भारत-चीन युद्धामुळे तिच्या पालकांनी तिला भारतात पाठवण्यास नकार दिला आणि तिथेच आमच्या दोघाचं नातं संपुष्टात आलं.
आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर आजीने केले संस्कार
रतन टाटा १० वर्षाचे होते त्यावेळी त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. आजी नवजबाई टाटा यांनी त्यांचा सांभाळ केला. रतन टाटांनी सांगितले की, आई-वडिलांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे मला आणि माझ्या भावाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तरीही आमचं बालपण नेहमी आनंदात गेले आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर आजीने आम्हा दोघा भावंडांना सुट्टीमध्ये लंडनला घेऊन गेली. त्याचठिकाणी आम्ही खऱ्याअर्थाने जीवनात अनेक मूल्य शिकलो. प्रतिष्ठा ही सर्व गोष्टींपेक्षा श्रेष्ठ असते असं आजीने आम्हाला समजावलं.
वडिलांचे विचार जुळत नव्हते
मला वायलिन शिकण्याची खूप इच्छा होती पण वडील पियानो शिकवण्यावर भर देत होते. मला कॉलेजचं शिक्षण अमेरिकेत घ्यायचं होतं पण वडिलांनी यूकेला पाठवलं. मला आर्किटेक्ट बनण्याची इच्छा होती पण वडील सांगायचे इंजिनिअर हो. आजी नसती तर मी अमेरिकेत शिक्षण घेऊ शकलो नसतो. आजीमुळे मी मॅकेनिकल इंजिनिअरींगमधून बाहेर पडत आर्किटेक्टमध्ये प्रवेश घेतला. वडील माझ्यावर नाराज झाले पण माझी इच्छा पूर्ण झाल्याने मी आनंदी होतो. आपलं म्हणणं मांडण्याची हिंमत करतानाही त्यात विनम्रता आणि सभ्यता असायला हवी हीदेखील शिकवण आजीने दिली आहे.