Video: सॅल्यूट! कॅन्सरपीडित विद्यार्थिनीचे केस गळाले; धीर देण्यासाठी शाळेतील सर्वांनी केले मुंडण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 13:33 IST2026-01-20T13:29:40+5:302026-01-20T13:33:33+5:30
‘तू एकटी नाहीस', कॅन्सरग्रस्त विद्यार्थिनीसाठी शाळेचा हृदयस्पर्शी उपक्रम!

Video: सॅल्यूट! कॅन्सरपीडित विद्यार्थिनीचे केस गळाले; धीर देण्यासाठी शाळेतील सर्वांनी केले मुंडण
Rajasthan Viral Video: राजस्थानच्या जोधपुर जिल्ह्यातील एक भावूक करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपले मुंडण केलेले दिसते. याचे कारण म्हणजे, शाळेतील कर्करोगाशी झुंज देणाऱ्या विद्यार्थिनीचे मनोबल वाढवण्यासाठी सर्वांनी हा अनोखा आणि संवेदनशील उपक्रम राबवला.
कर्करोगामुळे मानसिक तणाव
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शाळेतील एक विद्यार्थिनी कर्करोगाने ग्रस्त असून उपचारादरम्यान दिल्या जाणाऱ्या थेरपीमुळे केस गळाले होते. यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचून गेली होती आणि हळूहळू नैराश्यात जात होती. केस गळाल्यामुळे आपण इतरांपेक्षा वेगळी आहोत, अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली होती.
Girl Lost Her Hair Due To Cancer, So Classmates and Teachers Shaved Their Heads To Cheer Her Up | WATCH pic.twitter.com/oVJQnetFyv
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) January 19, 2026
तू एकटी नाहीस...शाळेचा भावनिक संदेश
विद्यार्थिनीला एकटेपणा जाणवू नये आणि तिचे मनोबल खचू नये, यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच शिक्षकांनी एकत्र येत मुंडण करण्याचा निर्णय घेतला. व्हायरल व्हिडिओमध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी मुंडण केल्याचे दिसते. हा प्रसंग सामाजिक संवेदनशीलता, सहानुभूती आणि मानवी मूल्यांचे प्रभावी दर्शन घडवतो.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. अनेकांनी ही कृती मानवता, एकजूट आणि सहकार्याचे उत्कृष्ट उदाहरण असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
अधिकृत माहिती अद्याप अस्पष्ट
दरम्यान, हा व्हिडिओ जोधपुरमधील नेमक्या कोणत्या शाळेचा आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. प्रशासन किंवा शाळा व्यवस्थापनाकडून याची औपचारिक पुष्टी झालेली नसली, तरीही या घटनेने समाजातील सकारात्मक आणि संवेदनशील बाजू समोर आणली आहे.