३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 16:12 IST2025-10-30T16:11:40+5:302025-10-30T16:12:47+5:30
'वेट लॉस' करण्यासाठी लोक काय काय करतील याचा काही अंदाज नाही. याच प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी, एका जिमने चक्क एक लक्झरी कार बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे.

३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
आजकाल लठ्ठपणा ही जागतिक समस्या बनली आहे. त्यामुळे 'वेट लॉस' करण्यासाठी लोक काय काय करतील याचा काही अंदाज नाही. याच प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी, उत्तर चीनमधील एका जिमने चक्क एक लक्झरी कार बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे. हे बक्षीस ऐकून तुम्हीही चकित व्हाल, कारण जिंकणाऱ्या व्यक्तीला थेट पोर्शे पनामेरा ही महागडी कार मिळणार आहे.
काय आहे हे भन्नाट आव्हान?
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, शेडॉन्ग प्रांतातील बिनझोउ येथील एका फिटनेस सेंटरने २३ ऑक्टोबर रोजी ही स्पर्धा जाहीर केली. फक्त तीन महिन्यांच्या कालावधीत स्पर्धकाला आपले ५० किलो वजन कमी करायचे आहे. जो स्पर्धक हे कठीण लक्ष्य पूर्ण करेल, त्याला बक्षीस म्हणून एक आलिशान पोर्शे पनामेरा कार दिली जाईल.
जिमच्या पोस्टरनुसार, बक्षीस म्हणून देण्यात येणाऱ्या या कारची किंमत चीनमध्ये जवळपास १.१ मिलियन युआन म्हणजे भारतीय चलनानुसार सुमारे १.३६ कोटी रुपये इतकी आहे.
जिम मालकाची स्वतःची कार बक्षीस!
या स्पर्धेच्या सत्यतेची पुष्टी वांग नावाच्या फिटनेस कोचने केली आहे. त्यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, हे आव्हान पूर्णपणे खरे आहे आणि स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेसाठी केवळ ३० स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाईल, ज्यापैकी आतापर्यंत ७-८ जणांनी नोंदणी केली आहे.
नियम व अटी काय?
स्पर्धकांना या चॅलेंजसाठी १०,००० युआन म्हणजेच सुमारे १.२३ लाख रुपये शुल्क भरावे लागेल. स्पर्धेच्या संपूर्ण तीन महिन्यांच्या कालावधीत स्पर्धक जिमने दिलेल्या 'कॉम्पिटिशन रूम्स'मध्ये राहतील.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बक्षीस म्हणून देण्यात येणारी पोर्शे कार नवी नाही! प्रशिक्षक वांग यांनी स्पष्ट केले की, "ही कार जिमच्या मालकाची आहे. ते मागील अनेक वर्षांपासून ती वापरत आहेत आणि ही २०२० मॉडेलची जुनी कार आहे." एका लक्झरी कारचे आमिष दाखवून लोकांना वजन कमी करण्यासाठी प्रेरणा देण्याचा हा चीनच्या जिमचा फंडा सध्या जगभर चर्चेचा विषय ठरला आहे.