Vishwas Nangre Patil Latest Post: आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील अने तरुणांचे आदर्श... त्यांनी जिद्द आणि चिकाटीच्या बळावर युपीएससी परीक्षेत यश मिळवले. पण, अभ्यास आणि सातत्य हे त्यांच्यात शालेय जीवनापासूनच आले होते. त्यांची आठवीची गुणपत्रिका बघून तुम्हालाही हे पटेल. महत्त्वाचं म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित अशा सगळ्याच विषयात त्यांना मिळालेले गुण बघून तुम्हालाही कौतुक वाटेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विश्वास नांगरे पाटील यांचे आठवीचे शिक्षण शिराळा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. १९८६ मध्ये त्यांनी आठवीची परीक्षा उत्तीर्ण केली. आठवीच्या चार तुकड्यांमध्ये विश्वास नांगरे पहिला क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले होते.
विश्वास नांगरेंची आठवीची गुणपत्रिका
विश्वास नांगरे पाटलांनी सांगितल्या आठवणी, वाचा पोस्ट
आठव्या वर्गाची गुणपत्रिका शेअर करत विश्वास नांगरे पाटील यांनी त्यावेळच्या आठवणींनाही उजाळा दिला आहे.
"कोकरूडच्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतून शिराळ्याला सातवी इयत्तेत न्यू इंग्लिश स्कुलमध्ये प्रवेश घेतला. मन रुळत नव्हते. सारखं गावाला जायची ओढ लागायची. कोकरूडला बारा महिने वाहत्या वारणा नदीत मनसोक्त डुंबायची सवय होती. शिराळ्याच्या मोरणा माई मध्ये फक्त पावसाळ्यातच वाहत पाणी असायचं."
"कोकरूडचे जि.प. शाळेतील विजार किंवा धोतर सदऱ्यातले मास्तर प्रेमळ होते. अभ्यासापेक्षा व्यायामावर भर असायचा. शासकीय पोषण आहार योजनेतले दूध मनसोक्त प्यायला मिळायचे. नव्या शाळेतील शिक्षक इस्त्री केलेले शर्ट पॅन्ट घालून यायचे. शाळेत भलती शिस्त होती. सगळे वर्ग वेळेवर व्हायचे. मुख्याध्यापक दिगवडेकर सरांचा आवाज आला तर सगळीकडे चिडीचूप व्हायची", अशा शाळेतील आठवणी विश्वास नांगरेंनी सांगितल्या.
"लवटे सरांच्या छडीने हात फुरफुर सुजायचा. छडी लागे छमछम विद्या येई घमघम. जोर जबरदस्तीने का होईना, हळूहळू अभ्यासाची गोडी लागली. स्पर्धा आवडायला लागली. दर महिन्याला चाचणी परीक्षा व्हायची. प्रत्येक परीक्षेची पायरी जिद्दीने चढायला सुरु केली. कष्टाला यशाची जोड मिळाली आणि मला सरस्वती माता प्रसन्न झाली. शास्त्र गणितात सूर गवसला. भाषा अध्ययनाचा नाद लागला. आणि दिव्य म्हणजे, आठव्या इयत्तेत चार तुकड्यामध्ये चारी मुंड्या चीत करून मिळून पहिला क्रमांक मिळवला. मग मात्र कधी वळून मागे पाहिले नाही", अशा शाळेतील आठवणी विश्वास नांगरे पाटलांनी यानिमित्ताने सांगितल्या.