Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 16:30 IST2025-12-19T16:29:26+5:302025-12-19T16:30:37+5:30
schoolgirl hair catches fire viral video: सोशल मीडियावर मुलीचं होतंय कौतुक

Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
schoolgirl hair catches fire viral video: सोशल मीडियावर अनेकदा अंगावर काटा आणणारे व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक थक्क करणारा प्रकार एका शाळेच्या कार्यक्रमात घडला, जिथे एका शाळकरी मुलीने दाखवलेल्या कमालीच्या धैर्याने नेटीझन्सची मने जिंकली आहेत. आपल्या केसांनी पेट घेतलेला असतानाही कोणतीही भीती न बाळगता किंवा आरडाओरडा न करता या मुलीने ज्या संयमाने परिस्थिती हाताळली, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेमकी घटना काय?
शाळेतील एका औपचारिक कार्यक्रमादरम्यान ही मुलगी स्टेजवर मेणबत्ती घेऊन उभी होती. यादरम्यान मेणबत्तीची ज्योत चुकून तिच्या केसांच्या संपर्कात आली आणि क्षणार्धात तिच्या लांब केसांनी पेट घेतला. कोणत्याही सामान्य व्यक्तीने अशा वेळी घाबरून ओरडाओरडा केला असता किंवा घाबरून धावपळ केली असती. मात्र, या मुलीने अत्यंत शांत राहून आपल्या हातांनी पटकन केसांमधील आग विझवून टाकली. तिने शांतपणे आग तर विझवलीच, पण त्यासोबतच कार्यक्रमात कुठलाही व्यत्यतही येऊ दिला नाही. ती पटकन अशी स्तब्ध उभी राहिली, जणू काही घडलंच नाही. त्यामुळेतच तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
हा व्हिडिओ केनेथ पेरेझ नावाच्या व्यक्तीने इंस्टाग्रामवर शेअर केला असून, ही मुलगी त्यांची भाची असल्याचे त्यांनी सांगितले. हा व्हिडिओ ६० मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. नेटीझन्सनी या मुलीच्या 'प्रेझेन्स ऑफ माईंड'चे (प्रसंगावधान) तोंडभरून कौतुक केले आहे. "मोठ्या माणसांनाही जमणार नाही इतक्या शांतपणे तिने ही परिस्थिती हाताळली," अशा प्रतिक्रिया युजर्स देत आहेत.
कठीण प्रसंगी डगमगून न जाता संयम कसा राखावा, याचे हे एक उत्तम उदाहरण असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. ही मुलगी सुदैवाने सुरक्षित असून तिचा शांत स्वभाव आणि धैर्य सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे.