थंडीला घाबरुन 'त्या' बहाद्दराने कॅरीबॅग घालून केली अंघोळ!, नेटकऱ्यांकडून विनोदी कमेंट्सची बरसात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 19:19 IST2025-11-27T19:18:17+5:302025-11-27T19:19:14+5:30
मनोरंजनाची पेटवली भट्टी !

थंडीला घाबरुन 'त्या' बहाद्दराने कॅरीबॅग घालून केली अंघोळ!, नेटकऱ्यांकडून विनोदी कमेंट्सची बरसात
सातारा : थंडी वाढली की गावोगावी शेकोट्या पेटविल्या जातात. कोणी उसाचे पाचट जाळतो, तर कोणी मिळेल ती वस्तू; पण एका बहाद्दराने थंडीपासून बचावासाठी केलेला जुगाड पाहून नेटकऱ्यांचे हसून हसून पोट दुखले. या पठ्ठ्याने चक्क अंगात प्लास्टिकच्या पिशव्या घालून आंघोळ केली. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो मनोरंजनाचा विषयही ठरला आहे.
या व्हिडीओद्वारे संबंधित तरुणाने महाबळेश्वरपेक्षाही साताऱ्यात जास्त थंडी आहे हे जणू जगाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडीओ नेमका कुठला आहे, याची नोंद नसली तरी थंडीवर मात करण्याचा त्याचा ही क्लृप्ती अनेकांच्या चर्चेचा आणि हास्याचा विषय ठरली. अलीकडे सोशल मीडिया हे नागरिकांच्या मनोरंजनाचे प्रभावी माध्यम बांधला आहे. त्यामुळे अनेक तरुण ऊन, वारा, पाऊस, थंडी अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये हटके पद्धतीने व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करू लागले आहेत. थंडीचा हा व्हिडीओदेखील त्यांच्या अफाट कल्पनाशक्तीचा एक प्रयोग म्हणावा लागेल.
मनोरंजनाची पेटवली भट्टी !
नेटकऱ्यांनीही या व्हिडीओवर आपल्या खुमासदार शैलीत प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. ‘कडक पाणी प्या, म्हणजे थंडी लागणार नाही, कॅरीबॅग घालून कोणी केली होती आंघोळ?’ अशा विनोदी कमेंट्सची बरसात झाली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी प्लास्टिक पिशवीची आयडिया कितपत यशस्वी झाली, हे माहीत नाही; पण या बहाद्दराने सोशल मीडियावर मात्र थंडीच्या वातावरणात मनोरंजनाची भट्टी पेटविली आहे.