Fact Check of Will Modi government give Rs 11,000 to students to pay school-college fees? | Fact Check: शाळा-कॉलेजची फी भरण्यासाठी मोदी सरकार विद्यार्थ्यांना देणार ११ हजार रुपये?

Fact Check: शाळा-कॉलेजची फी भरण्यासाठी मोदी सरकार विद्यार्थ्यांना देणार ११ हजार रुपये?

नवी दिल्ली – कोरोना संकटकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने कुटुंबातील उत्पन्न कमी झालं आहे. त्यातच मुलांच्या शाळा-कॉलेजचे ऑनलाइन क्लासेस सुरु झाले आहेत. यातच सोशल मीडियात एक पोस्ट व्हायरल होत आहे त्यात दावा केलाय की, कोरोना महामारीमुळे केंद्र सरकारनेशाळा आणि कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी ११ हजार रुपये देणार आहे.

या पोस्टमध्ये एक लिंक देण्यात आली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्हाला मदत मिळू शकते अशी पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. एका वेबसाईटनेही कोरोना महामारीमुळे शाळा कॉलेजमधील विद्यार्थी फी भरण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे सरकार सर्व विद्यार्थ्यांना ११ हजार रुपये देणार असून यातून विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेची फी भरता येणार आहे असं सांगण्यात आलं आहे.

मात्र याबाबत पीआयबी फॅक्ट चेकने हा दावा फेटाळून लावला आहे. केंद्र सरकारने अशाप्रकारे कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे या बनावट पोस्टमधील लिंकमध्ये जाऊन तुमची वैयक्तिक माहिती देणे धोकादायक ठरू शकतं असं म्हटलं आहे.

PIB फॅक्ट चेक काय करतं?

पीआयबी फॅक्ट चेक केंद्र सरकारची पॉलिसी, योजना, विभाग आणि मंत्रालयाबाबत चुकीची माहिती आणि अफवा रोखण्याचं काम करते. सरकार संबंधित कोणतीही माहिती खरी आहे किंवा खोटी आहे हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेऊ शकता. कोणतीही शंका उपस्थित करणारा संदेश अथवा स्क्रीनशॉट ट्विट, फेसबुक किंवा व्हॉट्सअप नंबर 8799711259 यावर पाठवता येते त्याचसोबत pibfackcheck@gmail.com वर ईमेल करु शकता.

कोरोनामुळे नवीन शैक्षणिक वर्षामध्ये मोठा बदल

विद्यापीठ अनुदान आयोगाने २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाचे पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार प्रथम वर्षासाठी १ नोव्हेंबर २०२० ते २९ ऑगस्ट २०२१ असे शैक्षणिक वर्ष असणार आहे. त्यात दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्ट्या कमी केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बारावीच्या निकालासह महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यावर परिणाम झाला.

विद्यापीठ अनुदान आयोगाने यापूर्वी दोन वेळा शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे शक्य झाले नाही. परंतु, आता यूजीसीने नवीन शैक्षणिक वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. पहिले सत्र १ नोव्हेंबरपासून ४ एप्रिलपर्यंत पूर्ण करावे लागेल. दुसरे सत्र ५ एप्रिलपासून २९ ऑगस्टपर्यंत असेल, असे यूजीसीतर्फे स्पष्ट केले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Fact Check of Will Modi government give Rs 11,000 to students to pay school-college fees?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.