भयंकर! सुंदर दिसण्याची ओढ बेतली जीवावर; कॉस्मेटिक सर्जरीनंतर प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 14:05 IST2026-01-07T14:05:15+5:302026-01-07T14:05:51+5:30
इटलीतील एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा कॉस्मेटिक सर्जरीनंतर मृत्यू झाला असून या घटनेमुळे कॉस्मेटिक सर्जरीच्या सुरक्षेबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.

भयंकर! सुंदर दिसण्याची ओढ बेतली जीवावर; कॉस्मेटिक सर्जरीनंतर प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा मृत्यू
आजच्या काळात स्वतःला सुंदर आणि आकर्षक दाखवण्याची एक मोठी स्पर्धाच सुरू झाली आहे. सोशल मीडियाचा वाढता प्रभाव आणि आधुनिक जीवनशैलीमुळे लोक आपल्या शरीरावर नवनवीन प्रयोग करत आहेत. असाच एक प्रयोग म्हणजे 'कॉस्मेटिक सर्जरी', ज्याच्या मदतीने लोक अधिक सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात. मात्र नुकत्याच घडलेल्या एका घटनेने सर्वांना हादरवून सोडलं आहे. इटलीतील एका सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा कॉस्मेटिक सर्जरीनंतर मृत्यू झाला असून या घटनेमुळे कॉस्मेटिक सर्जरीच्या सुरक्षेबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.
कोण होती यूलिया बुर्तसेवा?
यूलिया बुर्तसेवा ही एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर होती. इन्स्टाग्रामवर तिचे सुमारे ७०,००० फॉलोअर्स होते. ३८ वर्षीय यूलिया इटलीतील नेपल्स येथे पती ज्युसेपे आणि आपल्या लहान मुलीसोबत राहत होती. सोशल मीडियावर त्या एक प्रेमळ आई म्हणून ओळखली जाते. आपल्या मुलीसोबतचे दैनंदिन ब्लॉग, विनोद, खेळ आणि वैयक्तिक आरोग्याशी संबंधित माहिती ती सतत शेअर करत होती.
४ जानेवारीच्या सुमारास यूलिया कॉस्मेटिक सर्जरी करण्यासाठी इटलीहून रशियाची राजधानी मॉस्को येथे गेली होती. सर्जरीच्या काही वेळ आधीही तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला होता, ज्यामध्ये ती अत्यंत आनंदी दिसत होती. मात्र मॉस्कोमधील एका क्लिनिकमध्ये सर्जरी झाल्यानंतर तिची प्रकृती अचानक खालावली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
नेमकी कोणती सर्जरी केली होती?
रशियन मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूलियाने मॉस्कोच्या एका क्लिनिकमध्ये कॉस्मेटिक सर्जरी केली. नितंब अधिक सुडौल आणि मोठे करण्यासाठी सर्जरी केली होती. सर्जरीनंतर काही वेळातच तिची प्रकृती गंभीर झाली आणि दुर्दैवाने तिला जीव गमवावा लागला.
'एनाफिलेक्टिक शॉक' ठरला मृत्यूचं कारण
मिळालेल्या माहितीनुसार, सर्जरी दरम्यान यूलियाला 'एनाफिलेक्टिक शॉक' बसला. ही एक प्रकारची तीव्र एलर्जीक रिॲक्शन असते, जी औषधे किंवा भूल देण्याच्या प्रक्रियेमुळे होऊ शकते. यात ब्लड प्रेशर झपाट्याने कमी होतो, शरीरावर रॅशेस येतात आणि सूज येते. ही स्थिती अत्यंत जीवघेणी ठरू शकते आणि या प्रकरणातही तेच घडलं.