"सर, माझे आई-वडील नाहीत, तुम्हीच..."; विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका पाहून शिक्षकाचे पाणावले डोळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 15:30 IST2026-03-24T15:29:28+5:302026-03-24T15:30:20+5:30
परीक्षा संपल्यानंतर इयत्ता बारावीच्या एका विद्यार्थ्याचं पत्र सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

"सर, माझे आई-वडील नाहीत, तुम्हीच..."; विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका पाहून शिक्षकाचे पाणावले डोळे
आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये परीक्षा संपल्यानंतर इयत्ता बारावीच्या एका विद्यार्थ्याचं पत्र सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हे पत्र त्याने आपल्या उत्तरपत्रिकेत लिहिलं होतं, जे पाहून शिक्षकही हैराण झाले. सहसा विद्यार्थी उत्तरपत्रिकेत छोट्या-छोट्या नोट्स लिहितात, परंतु यावेळी जे समोर आलं ते अत्यंत भावूक आणि विचार करायला लावणारं होतं.
विद्यार्थ्याने लिहिलं, "सर, मी अनाथ आहे. माझे आई-वडील नाहीत, तुम्हीच माझे आई-वडील आहात, कृपया मला पास करा." याचसोबत त्याने असंही नमूद केलं की, त्याने जो अभ्यास केला होता, त्याबाबत परीक्षेत काही आलंच नाही. त्याने शिक्षकांना चक्क देवाचा दर्जा दिला आणि त्यांच्याकडे मदतीची याचना केली. हे शब्द त्याचा एकटेपणा आणि मानसिक दबाव स्पष्टपणे दर्शवतात.
या पत्रावरून असं दिसून येतं की, तो विद्यार्थी अभ्यासात ढ नव्हता, तर त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे त्याच्या अभ्यासात अडथळे आले. आई-वडिलांची साथ नसणं, भावनिक आधार न मिळणं आणि एकटेपणाची भावना यामुळे त्याचा आत्मविश्वास डळमळीत झाला. अशा परिस्थितीत विद्यार्थ्याचं अभ्यासावरून लक्ष विचलित होणं स्वाभाविक आहे. मुलाचं हे पत्र वाचून शिक्षकाचे डोळे पाणावले.
ही घटना शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींकडेही लक्ष वेधते. सरकारी महाविद्यालयांमध्ये जिथे विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष कमी दिलं जातं, तिथेच खासगी संस्थांमध्ये अधिक लक्ष दिलं जातं. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचा संपूर्ण दिवस अभ्यासातच जातो, ज्यामुळे ते मानसिकदृष्ट्या थकतात. आजच्या काळात शिक्षण हे ज्ञान घेण्यापेक्षा तणावाचं कारण बनलं आहे.
तासनतास चालणारे क्लासेस, होमवर्क आणि परीक्षेची भीती विद्यार्थ्यांना यंत्रासारखं बनवत आहे. अनेकदा त्यांना पुरेशी झोप आणि विश्रांतीही मिळत नाही. अशा परिस्थितीत छोट्याशा चुकीसाठीही त्यांना ओरडा किंवा शिक्षेला सामोरे जावं लागतं. हे पत्र व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी विद्यार्थ्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली, तर काहींनी सध्याच्या शिक्षण पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.