VIDEO : जुन्या फोनमधून २० मिनिटांत काढलं सोनं, पाहा वैज्ञानिकांनी कसा केला हा चमत्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:40 IST2026-01-09T16:33:56+5:302026-01-09T16:40:39+5:30
Gold From Phone : जरी एका मोबाईल किंवा एका रिमोटमधून मिळणारं सोनं फार जास्त नसलं, तरी इतक्या कमी वेळात आणि सोप्या पद्धतीनं सोनं काढणं ही खरोखर मोठी वैज्ञानिक कामगिरी आहे.

VIDEO : जुन्या फोनमधून २० मिनिटांत काढलं सोनं, पाहा वैज्ञानिकांनी कसा केला हा चमत्कार
Gold From Phone : आपण वापरत असलेल्या अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये सोनं वापरलं जातं, हे तुम्हाला माहीत असेलच. मोबाईल फोन, रिमोट कंट्रोल, टीव्ही, कॉम्प्युटर यांसारखी उपकरणं जुनी झाली की आपण ती फेकून देतो आणि ती ई-वेस्ट बनतात. मात्र आता शास्त्रज्ञांनी या ई-वेस्टची व्हिल्हेवाट लावण्यासाठी एक अत्यंत चमत्कारी आणि सोपी पद्धत शोधून काढली आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने ई-वेस्टमधून सोनं काढता येतं. जरी एका मोबाईल किंवा एका रिमोटमधून मिळणारं सोनं फार जास्त नसलं, तरी इतक्या कमी वेळात आणि सोप्या पद्धतीनं सोनं काढणं ही खरोखर मोठी वैज्ञानिक कामगिरी आहे.
चीनच्या शास्त्रज्ञांची मोठी कामगिरी
चीनमधील चायनीज अॅकॅडमी ऑफ सायन्सेस अंतर्गत येणाऱ्या ग्वांगझोउ इन्स्टिट्यूट ऑफ एनर्जी कन्वर्जन आणि साउथ चायना युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथील संशोधकांनी ही खास पद्धत शोधली आहे. संशोधनानुसार, ही प्रक्रिया सामान्य खोलीच्या तापमानावर अवघ्या 20 मिनिटांपेक्षा कमी वेळात इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून सोनं वेगळं करू शकते. विशेष म्हणजे, ही पद्धत सध्याच्या सोने पुनर्प्राप्ती तंत्रज्ञानाच्या तुलनेत सुमारे एक-तृतीयांश खर्चात पूर्ण होते. त्यामुळे ती आतापर्यंतच्या सर्वात स्वस्त तंत्रज्ञानांपैकी एक मानली जात आहे.
रिमोट आणि मोबाईलमधून 20 मिनिटांत सोनं
अनेक टेस्टमध्ये आढळून आले आहे की, जुन्या मोबाईल फोनच्या CPU म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि घरगुती उपकरणांच्या PCB म्हणजेच प्रिंटेड सर्किट बोर्डमधून 98.2 टक्क्यांहून अधिक सोनं यशस्वीपणे काढण्यात आलं. सध्या ई-वेस्ट हा जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या घनकचऱ्यांपैकी एक आहे. पारंपरिक पद्धतींमध्ये सोनं काढण्यासाठी सायनाइडसारख्या अत्यंत विषारी रसायनांचा वापर केला जातो, जो पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. याच समस्येवर उपाय म्हणून चीनमधील शास्त्रज्ञांनी ही नवीन पद्धत विकसित केली आहे, जी सेल्फ-कॅटलिटिक लीचिंग मेकॅनिझमवर आधारित आहे.
प्रक्रिया कशी सोपी झाली?
या नव्या प्रक्रियेत फक्त पोटॅशियम पेरॉक्सिमोनोसल्फेट आणि पोटॅशियम क्लोराइड यांच्या साध्या पाण्यातील द्रावणाचा वापर केला जातो. हे द्रावण जेव्हा सोनं किंवा पॅलेडियमच्या पृष्ठभागाच्या संपर्कात येतं, तेव्हा धातू स्वतःच उत्प्रेरक म्हणून काम करू लागतं. या प्रक्रियेदरम्यान सिंगलेट ऑक्सिजन आणि हायपोक्लोरस अॅसिडसारखे अत्यंत प्रतिक्रियाशील ऑक्सिडंट्स तयार होतात. हे घटक धातूचे कण तोडून त्यांना द्रावणात विरघळवतात, ज्यामुळे नंतर सोनं सहजपणे वेगळं करता येतं.
संशोधनात असंही आढळलं की, या पद्धतीने 93.4 टक्के पॅलेडियम देखील मिळवता येते. आकडेवारीनुसार, जर 10 किलो जुन्या सर्किट बोर्डावर जर प्रक्रिया केली, तर त्यातून साधारण 1.4 ग्रॅम सोने मिळू शकतं. हे महत्त्वपूर्ण संशोधन जगप्रसिद्ध वैज्ञानिक जर्नल Angewandte Chemie International Edition मध्ये प्रकाशित झाले आहे.