"पैसा सर्वकाही नाही, मन मोठं हवं!"; कंपनीची १,००० कर्मचाऱ्यांसाठी फ्रीमध्ये थेट 'लंडन ट्रिप'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 16:51 IST2025-11-28T16:50:14+5:302025-11-28T16:51:54+5:30
चेन्नईच्या प्रसिद्ध रिअल इस्टेट डेव्हलपर, कासाग्रँडने त्यांच्या १,००० कर्मचाऱ्यांसाठी एक आठवड्याची लंडन ट्रिप पूर्णपणे मोफत देण्याची घोषणा केली आहे.

प्रातिनिधिक फोटो
आजकाल आपण अनेकदा लोकांना त्यांच्या ऑफिस, कामाचा ताण आणि त्यांच्या बॉसबद्दल तक्रार करताना ऐकतो. काहींना सुटी मिळत नाही, काहींना कामाच्या ठिकाणी मुद्दाम जास्त काम दिलं जातं. पण याच दरम्यान चेन्नईच्या एका कंपनीने असं काही केलं आहे ज्यामुळे लोकांना आश्चर्य आणि आनंद झाला आहे. सोशल मीडियावर लोक, "देवा, माझ्या नशिबातही असा बॉस दे, कंपनी दे. पैसा सर्वकाही नाही, फक्त मन मोठं हवं आहे" असं म्हणत आहेत.
चेन्नईच्या प्रसिद्ध रिअल इस्टेट डेव्हलपर, कासाग्रँडने त्यांच्या १,००० कर्मचाऱ्यांसाठी एक आठवड्याची लंडन ट्रिप पूर्णपणे मोफत देण्याची घोषणा केली आहे. ही कोणतीही लॉटरी नाही, तर कर्मचाऱ्यांच्या वर्षभराच्या कष्टाचं हे बक्षीस आहे. दरवर्षी कासाग्रँड त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रमाचा उत्सव प्रॉफिट शेअर बोनान्झा नावाच्या कार्यक्रमाद्वारे साजरा करते.
कंपनी स्पष्टपणे सांगते की, हे यश कंपनीच्या लोकांच्या कठोर परिश्रमामुळे आहे आणि म्हणूनच, उत्सव त्यांच्यासाठी आहे. आतापर्यंत, या योजनेअंतर्गत, ६,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना सिंगापूर, थायलंड, मलेशिया, दुबई आणि स्पेन सारख्या ठिकाणी ट्रिपसाठी नेण्यात आले आहे. लोक गंमतीने म्हणतात की, ही कंपनी रिअल इस्टेट कमी आणि स्वप्नं जास्त पूर्ण करते.
कंपनी तिच्या भारतातील आणि दुबई कार्यालयातील १,००० कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या बॅचमध्ये लंडनला घेऊन जाईल आणि व्यवस्था पूर्णपणे शाही असेल. विंडसर कॅसल, कॅम्डेन मार्केट, बिग बेन, बकिंगहॅम पॅलेस, लंडन ब्रिज आणि मॅडम तुसाद संग्रहालय अशी अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत. शिवाय, इंटरकॉन्टिनेंटल लंडन हॉटेलमध्ये एक ग्रँड डिनर पार्टी आणि ट्रिपच्या शेवटच्या दिवशी थेम्स रिव्हर क्रूझचा समावेश असेल.
कंपनीचे संस्थापक आणि एमडी अरुण एमएन म्हणाले, "आमची टीम आमच्या संस्थेचा आत्मा आहे. अनेक सहकारी पहिल्यांदाच परदेश प्रवास करत आहेत, जी आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही भेदभाव नाही.सर्वजण एकत्र प्रवास करतील, सर्वांना समान सुविधा आणि व्हीआयपी वागणूक मिळेल." लोकांनी या कंपनीचं भरभरून कौतुक केलं आहे.