घरात घुसली ८ फूट लांब आणि ८० किलोंची मगर; पठ्ठ्याने एकट्यानेच नेली उचलून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 16:18 IST2025-10-12T16:16:16+5:302025-10-12T16:18:30+5:30
Crocodile Rajasthan: राजस्थानातील कोटामध्ये एक घटना घडली. एक ८० किलो वजन असलेली मगर थेट घरात घुसली. तिला पकडताना वन विभागाची दमछाक झाली.

घरात घुसली ८ फूट लांब आणि ८० किलोंची मगर; पठ्ठ्याने एकट्यानेच नेली उचलून
आठ फूट लांब आणि ८० किलो वजन असलेली मगर थेट घरात घुसली. ज्यावेळी मगर घरात आली, त्यावेळी घरातील सगळेच गप्पा मारत, हसत होते. पण, घरात आलेली मगर बघून सगळ्यानाच घाम फुटला. कसेतरी ते घरातून बाहेर पळाले. संपूर्ण गावातच गोंधळ उडाला. त्यानंतर याची माहिती वन विभागाला देण्यात आली. कोटा जिल्ह्यातील बंजारी गावात १० ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. मगरीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
मगर घरात कशी आली?
ज्या घरात मगर घुसली, त्या कुटुंबातील लटूरलाल यांनी सांगितले की, "रात्रीचे दहा वाजले असतील. आम्ही घरातील सगळे गप्पा मारत बसलेलो होतो. त्याचवेळी अचानक दरवाजातून मगर घरात घुसली. आम्हाला काही कळायच्या आतच मगर मागच्या खोलीत गेला. आम्ही सगळे खूप घाबरलो आणि बाहेर पळालो."
गावाच्या बाजूलाच एक तलाव आहे, त्यात बऱ्याच मगरी आहेत. ग्रामस्थांनी सांगितले की, मगरींच्या भीतीमुळे तलावाकडे जाणे टाळतो. तलावाच्या पाण्याचा वापरही बंद केला आहे, कारण मगरींची भीती वाटते.
हयात खान टायगर यांनी पकडली मगर
वन विभागाला मगर घुसल्याची माहिती दिली गेली. हयात खान टायगर यांच्यावर मगरीला पकडण्याची जबाबदारी देण्यात आली. हयात खान पथकासह आले. त्यांनी मगरीला पकडण्याचा प्रयत्न सुरू केले. बऱ्याच वेळानंतर मगरीच्या तोंड बांधण्यात आले. त्यानंतर मगरीचे पाय बांधण्यात आले.
मध्यरात्रीपर्यंत मगरीचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. सुरक्षितपणे मगरीला पकडल्यानंतर हयात खान टायगर यांनी एकट्यानेच ८० किलोची मगर उचलून खांद्यावर घेतली आणि वन विभागाच्या वाहनात नेऊन ठेवली. त्यानंतर मगर चंबळ नदीत सोडण्यात आली. बंजारी गावात मगर आढळून आल्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी दोन मगरी पकडण्यात आल्या आहेत, असे हयात खान यांनी सांगितले.