Video: खरी श्रीमंती पैसा नाही; ₹42 लाखांची नोकरी सोडणाऱ्या तरुणाची सोशल मीडियावर होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 12:28 IST2026-01-21T12:23:20+5:302026-01-21T12:28:15+5:30
तब्बल ₹42 लाख वार्षिक पगाराची नोकरी सोडूनदेखील तरुण खूप खुश आहे.

Video: खरी श्रीमंती पैसा नाही; ₹42 लाखांची नोकरी सोडणाऱ्या तरुणाची सोशल मीडियावर होतेय चर्चा
Viral Video: भरगच्च पगार, आलिशान गाडी आणि यशस्वी कॉर्पोरेट आयुष्य...हेच आपले अंतिम समाधान किंवा अंतिम लक्ष्य असते का? सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने याबाबत चर्चा सुरू झाली आहे. शिवम लखनपाल नावाच्या व्यक्तीने वैयक्तिक आनंद आणि मानसिक शांततेला प्राधान्य देणासाठी तब्बल ₹42 लाख वार्षिक पगाराचीनोकरी सोडली. त्यांच्याच व्हिडिओमुळे सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच चर्चेला तोंड फोडले आहे.
पैसा म्हणजे संपत्तीचे मोजमाप नाही
शिवम लखनपाल यांनी शेअर केलेल्या व्हिडिओची सुरुवातच एका ठळक ओळी होत्या- “I quit my 42 LPA job.” या व्हिडिओत ते म्हणतात, माणसाची खरी श्रीमंती पैशांवर मोजता येत नाही. मला आता हे स्पष्टपणे समजले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत असताना मिळणारा मोठा पगार असूनही आपण आतून असुरक्षित आणि सतत मान्यतेच्या शोधात असल्याची भावना जाणवत होती.
आलिशान गाडी असूनही ‘अयोग्य’ वाटण्याची भावना
नोकरीत असताना घेतलेल्या ₹18 लाखांच्या गाडीबद्दलचा अनुभव सांगताना लखनपाल म्हणतात की, पहिल्यांदा गाडीत बसलो तेव्हा मला वाटले, ही गाडी चालवण्याइतका मी ‘मर्दानी’ नाही. जणू मी तिचा हकदारच नाही. या भावनेतून त्यांची मानसिक अवस्था किती तणावपूर्ण होती, हे स्पष्ट होते. मोठे यश मिळूनही आत्मसन्मानाची कमतरता त्यांना सतावत होती.
नोकरी सोडल्यानंतर बदललेले आयुष्य
काही महिन्यांपूर्वी कॉर्पोरेट नोकरी सोडल्यानंतर मात्र चित्र पूर्णपणे बदलले. लखनपाल सांगतात की, आता ते अधिक आनंदी आहेत आणि तो बदल त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. आता मी तीच गाडी ‘बॅटमोबाईल’सारखी चालवतो, असे म्हणत त्यांनी आत्मविश्वास परत मिळाल्याचे सांगितले.
सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया
या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया देणाऱ्यांचा अक्षरशः पूर आला आहे. एका युजरने लिहिले, तुझ्या चेहऱ्यावरचा बदल स्पष्ट दिसतो. आता तू अधिक शांत, आनंदी आणि जिवंत वाटतोस. तर, दुसऱ्याने भावनिक शब्दांत म्हटले, तुझ्यातील उब आणि प्रामाणिकपणा खूप प्रेरणादायी आहे. तू जसा आहेस, तसे आयुष्य मला जगायचे आहे. आणखी एका युजरने म्हटले, खरी मुक्तता तेव्हाच मिळते, जेव्हा माणूस स्वतःच्या अटींवर जगू लागतो.
संपत्तीपेक्षा समाधान महत्त्वाचे?
शिवम लखनपाल यांची ही कथा केवळ नोकरी सोडण्याची नाही, तर आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जीवनशैलीत मानसिक आरोग्य, आत्मसन्मान आणि वैयक्तिक आनंद यांचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. लाखोंचा पगार सोडण्याचा निर्णय सगळ्यांसाठी योग्य नसेल, पण यशाची व्याख्या काय? हा प्रश्न मात्र त्यांनी अनेकांसमोर उभा केला आहे. प्रत्येकासाठी यशाची व्याख्या वेगळी असू शकते, लखनपाल यांच्या मते पैसा म्हणजे आयुष्य नाही.