महामार्गाबाबतची आश्वासने सत्यात उतरतील का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 03:28 PM2020-08-12T15:28:44+5:302020-08-12T15:30:27+5:30

कणकवली शहराबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिने दळणवळणाची चांगली सोय निर्माण होण्यास मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम महत्वपूर्ण ठरणार आहे.

Will highway promises come true? | महामार्गाबाबतची आश्वासने सत्यात उतरतील का ?

 कणकवली शहरालगत महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत जानवली नदीवर पूल उभारण्यात येत आहे.

Next
ठळक मुद्देमहामार्गाबाबतची आश्वासने सत्यात उतरतील का ?नागरिकांचा प्रश्न ; सुरक्षिततेबाबत व्यक्त केली जातेय चिंता

सुधीर राणे

कणकवली : कणकवली शहराबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिने दळणवळणाची चांगली सोय निर्माण होण्यास मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम महत्वपूर्ण ठरणार आहे. मात्र, या कामाला प्रारंभ करण्यापूर्वी राजकीय नेत्यांकडून जनतेला या महामार्गाबाबत दाखविण्यात आलेली स्वप्ने आणि दिली गेलेली आश्वासने त्यासाठी सत्यात उतरणे आवश्यक आहेत. या महामार्ग चौपदरीकरण कामाची सद्य:स्थिती पहाता नागरीकांकडून आपल्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाराप ते खारेपाटण या दरम्यान मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या चौपदरीकरणात कणकवली शहराचा समावेश आहे. २५० ते ३०० वर्षापूर्वी गड आणि जानवली नदीच्या काठावर कणकवली शहर वसले. या शहरात १८४३ मध्ये कलमठातील बाजारपेठ वसली असे सांगितले जाते.

सुती कापडाची बाजारपेठ ते कला, संस्कृती, राजकीय आणि आर्थिक राजधानी अशी आजवरची कणकवली शहराची वाटचाल राहिली आहे.ती महामार्ग चौपदरिकरणानंतर बदलण्याची शक्यता असून एकंदर शहराचे रूपडेच पालटणार आहे.अशीच काहीशी स्थिती कणकवली तालुक्यातील खारेपाटण , तळेरे , नांदगाव , हुंबरठ , जानवली , वागदे, ओसरगाव तसेच कुडाळ तालुक्यातील झाराप पर्यंतच्या गावांचीही होणार आहे.

कणकवली शहरातील गड आणि जानवली नदीवर १९३४ मध्ये ब्रिटिशांनी पूल बांधले. त्यानंतर होडी वाहतूक बंद होऊन नव्या पुलावरून वाहतूक सुरू झाली. तसेच गड आणि जानवली नदी दरम्यानच्या महामार्गालगत अनेक कौलारू घरे उभी राहिली. त्यामध्ये आजतागायत चार ते पाच पिढ्या नांदल्या. तर त्यावेळी महामार्गालगत कौलारू असलेली हॉटेल्स व इतर दुकाने कालांतराने सिमेंट क्रॉंक्रिटची झाली. मात्र, चौपदरीकरणा दरम्यान ब्रिटिशकालीन पुले तोडल्याने फक्त मनात त्याबाबतच्या आठवणीच आता शिल्लक राहणार आहेत.

महामार्गावरील खारेपाटण, पियाळी अशी अनेक ब्रिटिश कालीन पुले आहेत. ती तोडून त्याठिकाणी नवीन पूल उभारण्यात आले आहेत. जानवली तसेच अन्य ठिकाणीही काम सुरू आहे.

कणकवली शहरातील उड्डाणपुलाचा पहिला पिलर एस.एम.हायस्कूल दरम्यान आहे. तर शेवटचा पिलर कणकवली श्रीधर नाईक चौकासमोर आहे. एकूण १२०० मिटर लांबीच्या या उड्डाणपुलाला ४५ पिलर आहेत. सध्या पिलरचे काम पूर्ण झाले असून त्यावरील स्लॅबचे काम काही ठिकाणी पूर्ण झाले आहे.

या महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू होण्यापूर्वी शहरातील उड्डाणपूलाच्या दुतर्फा सहा मिटरचे दोन सर्व्हिस रोड होणार होणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते. मात्र, एवढ्या रुंदीचे सर्व्हिस रस्ते शहरात कोठेच दिसत नाही . याखेरीज महामार्गाच्या दुतर्फा पाच फुटाचा पदपथ, त्याखाली गटार, गटाराच्या बाजूलाच जलनि: स्सारण वाहिनी, भूमिगत वीज वाहिन्या आणि विविध कंपन्यांच्या केबलसाठी पाच ते सात फुटाची जागा सोडली जाईल. तर पुलाखाली काही ठिकाणी रिक्षा आणि इतर पार्किंगसाठी जागा निश्‍चित केली जाईल.

असे राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी तसेच अनेक राजकीय नेत्यांनी यापूर्वी जाहीर केले होते. मात्र , सध्या सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम व काही ठिकाणचे सर्व्हिस रोड तसेच त्याच्या बाजूला मारलेली गटारे हे काम वगळले तर उर्वरित कामाबाबत काहीच हालचाल दिसत नाही. त्यामुळे आगामी काळात ही कामे पूर्ण होणार का ? याबाबत नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यावर ठेकेदार कंपनी कणकवलीतील नागरिकांसाठी अत्यावश्यक असलेल्या या कामाकडे दुर्लक्ष करील.अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहेत.

या महामार्गाचे काम किमान शँभर वर्षे तरी टिकेल. असे केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाच्या चौपदरीकरण कामाच्या प्रारंभ प्रसंगी सांगितले होते. पण अलीकडच्या काळात कणकवलीत महामार्गाच्या उड्डाणपूल व बॉक्सेल बाबत घडलेल्या घटना पहाता हे काम किती काळ टिकेल याची शँकाच येत आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी या बाबीकडे गांभीर्याने बघत महामार्ग प्राधिकरण तसेच ठेकेदार कंपनी यांच्याकडून नियमाप्रमाणे दर्जेदार काम करून घेणे आवश्यक आहे. तरच जनतेला दिलेले आश्वासन सत्यात उतरेल.

टोल नाका उभारणार !

मुंबई -गोवा महामार्गावर सिंधुदुर्गात दिलीप बिल्डकॉन कंपनीचा टोलनाका ओसरगाव येथे तर केसीसी बिल्डकॉनचा टोलनाका रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे असणार आहे. हे टोल नाके वाहनचालकांसाठी डोके दुखी ठरणार आहेत. या नाक्यावर स्थानिक वाहनचालकांना टोल भरण्यापासून सूट द्यावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. त्याबाबत राजकीय नेत्यांनी तसेच प्रशासनाने नेमके स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा 'जैसे थे ' !

कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांचा पुतळा महामार्ग चौपदरीकरणात बाधित होत आहे. त्यामुळे या पुतळ्याच्या स्थलांतरणाचा वाद काही दिवसांपूर्वी पेटला होता. मात्र, अजूनही या पुतळ्याबाबतचा निर्णय झालेला नाही. तसेच स्थलांतरणासाठी जागा निश्चित झालेली नाही. त्यामुळे हा प्रश्न 'जैसे थे' च आहे.

Web Title: Will highway promises come true?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.