गुड न्यूज: 'वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग' ठरताहेत मुक्या जीवांचे देवदूत..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 12:31 IST2025-01-01T12:28:55+5:302025-01-01T12:31:01+5:30

संदीप बोडवे मालवण: सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्यजीवांचे रक्षण आणि पुनर्वसनाचे उल्लेखनीय काम करणारी एक संस्था म्हणजे 'वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग'. ...

'Wild Life Rescuer Sindhudurg' This organization has been helping various animals and birds for the past eight years | गुड न्यूज: 'वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग' ठरताहेत मुक्या जीवांचे देवदूत..

गुड न्यूज: 'वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग' ठरताहेत मुक्या जीवांचे देवदूत..

संदीप बोडवे

मालवण: सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्यजीवांचे रक्षण आणि पुनर्वसनाचे उल्लेखनीय काम करणारी एक संस्था म्हणजे 'वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग'. गेल्या आठ वर्षांपासून ही संस्था निःस्वार्थपणे जिल्ह्यातील विविध प्राणी आणि पक्ष्यांना मदत करत आहे. आपत्कालीन परिस्थितीत सेवा पुरविणे, निसर्ग संवर्धन आणि त्याची जनजागृती या कामातही संस्थेने अल्पावधीतच आपला वेगळा ठसा उमटविला आहे. मदतीच्या प्रतिक्षेत असलेल्या मुक्या हतबल जीवांसाठी ही संस्था देवदूतच ठरत आहे.

संकटात सापडलेल्या वन्यजीवांना तात्काळ मदत पुरविण्यात यावी या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही आणि मित्रांनी एकत्र येत वाईल्ड लाईफ रेस्क्युअर सिंधुदुर्ग या संस्थेची स्थापना केली. आज या संस्थेच्या प्राणी मित्रांनी संकटात सापडलेल्या शेकडो जीवांना नवे जीवन दिले आहे.

अशाच एका घटनेमध्ये लहानपणी बांधलेला बेल्ट कुत्रा मोठा होत होता तसा त्याच्या गळ्यात रूतत गेला. मुक्या जनावरांना काय कळणार? त्याला काहीच करता येईना. त्या कुत्र्याच्या आईने व तिथल्या स्थानिकांनी प्रयत्न केला पण तो पट्टा काही निघेना. गेले आठ दिवस स्थानिकांनी खूप प्रयत्न केले पण कुत्रा हातही लावून घेत नव्हता. शेवटी सिंधुदुर्ग वाइल्ड रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. त्या टिमने आपल्या कौशल्यावर त्या कुत्र्याला या संकटातून वाचवले. मानेमध्ये पूर्ण रुतलेला बेल्ट काढून त्यावर उपचार करून त्याला जीवदान दिले. 

संस्थेचे कार्यक्षेत्र

भटकी जनावरे आणि वन्यजीवांचा बचाव: रस्ते अपघात, विहिरीत पडणे, जाळ्यात अडकणे अशा विविध परिस्थितीत अडकलेल्या प्राण्यांना सुरक्षितपणे बाहेर काढून त्यांना योग्य वैद्यकीय सुविधा पुरवणे. प्राणी आणि पक्ष्यांना कोणत्याही प्रकारच्या आपत्तीच्या वेळी मदत करणे. लोकांमध्ये वन्यजीवांबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि त्यांच्या संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे. उन्हाळ्यात पक्षी, कीटक आणि इतर प्राण्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वॉटर बॉल्स बसवणे. 

संस्थेने केलेले उल्लेखनीय काम

संस्थेने आतापर्यंत १०० कॅन्सरग्रस्त कुत्रे, १५ स्नेक बाईट कुत्रे, १५ कुत्रे ड्रेनेज आणि विहिरीतून वाचवले आहेत. तसेच, जाळ्यात अडकलेले साप, माकड, समुद्री कासव, पक्षी आणि विहिरीत पडलेले कोल्हे, मगरी, जंगली मांजर, गायी आणि वासरं यांनाही नवजीवन दिले आहे. रस्ते अपघातात जखमी झालेल्या कुत्रे, गायी आणि माकडांना वैद्यकीय सुविधा पुरवून त्यांना पुनर्स्थापित केले आहे. मोकाट जनावरांना रस्ते अपघातांपासून वाचवण्यासाठी त्यांच्या गळ्यात रेडियम बेल्ट बसवले आहेत. पक्षी, कीटक आणि इतर प्राण्यांना उन्हाळ्यात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी १५००वॉटर बॉल्स बसवले आहेत. 

संस्थेला आर्थिक मदत करून प्रोत्साहन द्या

डॉ. प्रसाद धुमक, ओमकार लाड, विष्णू मसके, कृष्णा कदम, दीपक दुतोंडकर, सिद्धेश ठाकूर, संदीप चिऊलकर, शिल्पा खोत, दर्शन वेंगुर्लेकर हे संस्थेचे सदस्य आहेत. वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग, हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वन्यजीवांचे खरे मित्र आहेत. त्यांचे हे उल्लेखनीय कार्य पाहून आपल्या मनातही वन्यजीवांबद्दल प्रेम आणि आदर निर्माण होतो. या संस्थेला आपल्या सहकार्याची गरज आहे. आपणही या उमद्या कामात सहभागी होऊन या संस्थेला आर्थिक मदत करून त्यांना प्रोत्साहन देऊ शकता.

Web Title: 'Wild Life Rescuer Sindhudurg' This organization has been helping various animals and birds for the past eight years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.