घातक ऊर्जानिर्मितीचे उत्तरदायित्त्व कोण घेणार ?

By Admin | Updated: January 29, 2015 00:07 IST2015-01-28T22:37:58+5:302015-01-29T00:07:32+5:30

रवींद्र वायकर : पालकमंत्री पदावरील नियुक्तीनंतर राजापुरात पहिलाच मेळावा

Who will take responsibility for dangerous energy? | घातक ऊर्जानिर्मितीचे उत्तरदायित्त्व कोण घेणार ?

घातक ऊर्जानिर्मितीचे उत्तरदायित्त्व कोण घेणार ?

राजापूर : आपल्याकडे उर्जानिर्मितीचे अनेक उपाय आहे. असे असताना अणुंपासून घातक उर्जा निर्मिती निर्माण करुन त्याचे दायित्त्व कुणी घेणार आहे का? असा सवाल उपस्थित करीत शिवसेना पक्षाने जी भूमिका घेतली तीच पालकमंत्री या नात्याने आपली राहिल, अशी ग्वाही पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आपल्या पहिल्या राजापूर दौऱ्यात मांडली.
जिल्हा पालकमंत्री म्हणून रवींद्र वायकर प्रथमच राजापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी पार पडलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात समुद्र किनारा लाभला आहे. त्यापासून केवळ मासे एवढेच उत्पन्न आपण घेतो. मात्र, त्या समुद्रात आणखी बरेच काही लपले आहे. अन्य देशांनी त्याचा यापूर्वीच शोध घेतला. तशाच प्रकारे आपल्याला देखील ते करायचे आहे, असे स्पष्ट करीत त्यांनी भविष्यात समुद्र संशोधनावर भर देणार आहे.
उन्हाळी दिवसात ठिकठिकाणी जाणवणारी तीव्र पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी शासनाने जलाधिकार योजना सुरु केली असून, त्या माध्यमातून लांजा, राजापूर तालुक्यात ही योजना प्राथमिकतेने राबविणार आहोत व मे महिन्यापूर्वी अनेक ठिकाणी कामे पूर्ण व्हावीत, याची दक्षता आम्ही घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येथील रखडलेल्या धरणांचा प्रश्न पाच वर्षांत निश्चित मार्गी लावू. त्यादृष्टीने जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्याशी लवकरच चर्चा करणार आहे, असे पुढे बोलताना ते म्हणाले.
महामार्गावर घडणारे अपघात व धोकादायक कशेडी घाटासंदर्भात बोलताना, त्यांनी या घाटात बोगदा काढला जाईल, जेणेकरुन पाच मिनीटांत हे अंतर पार करणे सोईचे ठरेल, अशी माहिती दिली.
यावेळी त्यांच्यासमवेत मुुंबई विद्यापीठाचे व्हाईस चॅन्सेलर नरेशचंद्र यांसह अनेक सेना सदस्य उपस्थित होते. राजापूर तालुक्यात प्रथमच पालकमंत्री रवींद्र वायकर आले होते; त्यामुळे ते जैतापूर प्रकल्पावर ते काय भाष्य करतात त्याची उत्सुकता उपस्थितांना होती. जैतापूरप्रश्नी पक्षाने जी भूमिका घेतली आहे, तीच आपलीही राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी आमदार राजन साळवी, गणपत कदम यांनी आपल्या भाषणात राजापुरातील समस्या मांडल्या. जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, पांडुरंग उपळकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Who will take responsibility for dangerous energy?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.