खेळत असतानाच बालिकेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 18:13 IST2019-11-18T18:10:41+5:302019-11-18T18:13:15+5:30
काही वेळाने प्रांजली पुन्हा खेळायला गेली. त्यावेळी परत ती जमिनीवर कोसळली व बेशुद्ध झाली. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिला तत्काळ खासगी रुग्णालयात नेले.

खेळत असतानाच बालिकेचा मृत्यू
कणकवली : घराशेजारी खेळत असताना अचानक बेशुद्ध पडलेल्या प्रांजली प्रफुल्ल सावंत (६, रा. कणकवली-बांधकरवाडी) या बालिकेचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.
शिरवल येथील मूळ रहिवासी प्रफुल्ल सावंत हे बांधकरवाडी येथे राहतात. त्यांची सहा वर्षांची मुलगी प्रांजली रविवारी सायंकाळी घराशेजारी खेळत होती. ती अचानक जमिनीवर खाली पडली. त्यानंतर तिचे डोके दुखू लागल्याने तिने आपल्या आजीला सांगितले. आजीने डोके दाबून दिले. काही वेळाने प्रांजली पुन्हा खेळायला गेली. त्यावेळी परत ती जमिनीवर कोसळली व बेशुद्ध झाली. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिला तत्काळ खासगी रुग्णालयात नेले.
तेथील डॉक्टरनी तिला उपजिल्हा रुग्णालयात न्यायला सांगितले. मात्र तिथे नेल्यावर डॉक्टरनी तिची प्राणज्योत मालवल्याचे सांगितले. प्रांजलीच्या पश्चात आजी, आजोबा, आई, वडील व एक जुळी बहीण असा परिवार आहे.