भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात मुस्लीम मतदार कुठून आले?; निलेश राणेंचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2025 13:01 IST2025-11-23T12:58:26+5:302025-11-23T13:01:06+5:30
हे बोगस मतदार आहेत, हे दाखवण्याचा आमचा प्रयोग होता. तो निवडणूक आयोगासमोर ठेवला आहे. हे मतदार कसे आले, यादीत कधी आले आणि हे मुस्लीम मतदार भाजपाला का मान्य आहेत असा सवाल निलेश राणे यांनी केला.

भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात मुस्लीम मतदार कुठून आले?; निलेश राणेंचा खळबळजनक दावा
सिंधुदुर्ग - राज्यात नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ताधारी भाजपा विरुद्ध सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत. त्यात शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजपावर खळबळजनक आरोप केला आहे. भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात ३ मुस्लीम मतदारांची नावे जोडण्यात आली, ते कुठून आले असा सवाल करत निलेश राणेंनी १६९ मतदार बोगस असल्याचा दावा केला आहे.
आमदार निलेश राणे यांनी म्हटलं की, मी निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. कणकवलीचे भाजपा नगराध्यक्ष उमेदवार समीर नलावडे आहेत, त्यांच्या घरात ३ मुस्लीम मतदार आहेत, ते मतदार कुठून आले याची तक्रार केली आहे. १६९ मतदार हे वेगवेगळ्या भागातून कुणी नेपाळमधून, कुणी ठाण्यातून इथं आले आहेत, हे मतदार कधी आले, त्यांचा कणकवलीशी संबंध काय? अचानकपणे मतदार यादीत नावे घुसवली गेली. मी पुराव्यासह हे दाखवले. आम्हाला त्याची पडताळणी करून द्यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली, मात्र शनिवार-रविवार असल्याने निवडणूक आयोग सुट्टीवर आहे. निवडणूक ९ दिवसांवर आहे, परंतु आयोग सुट्टीवर आहे. जर मला याबाबत योग्य उत्तर मिळाले नाही तर मी सोमवारी धिंगाणा घालणार, मी आंदोलनाला कधीही बसू शकतो, त्याला आचारसंहिता लागत नाही. निवडणूक पारदर्शक झाली पाहिजे. समान न्यायाने झाली पाहिजे. कुठल्यातरी बाहेरच्या लोकांकडून मतदान करून ही निवडणूक पारदर्शी होणार नाही असा आरोप त्यांनी केला.
तसेच भाजपा मुस्लीम मते आणते हे अतिशय शॉकिंग आहे. भाजपाला मुस्लीम मते घुसवावी लागतात. हा एका वार्डाचा विषय नाही, दुसऱ्या वार्डात ४० मुस्लीम मते वाढवली आहेत. आपण महाराष्ट्रात काय बोलतो, भाजपाला उमेदवारीत मुस्लीम चालत नाही परंतु त्यांची मते चालतात. ती कशामुळे चालतात हा भाग वेगळा आहे. हे बोगस मतदार आहेत, हे दाखवण्याचा आमचा प्रयोग होता. तो निवडणूक आयोगासमोर ठेवला आहे. हे मतदार कसे आले, यादीत कधी आले आणि हे मुस्लीम मतदार भाजपाला का मान्य आहेत त्यावर नंतर बोलू. परंतु हे बोगस मतदार आहेत, त्यांची ओळख पटवा. जर निवडणूक आयोगाने कार्यवाही केली नाही तर आम्हाला भूमिका घ्यावी लागेल असा इशारा शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे यांनी दिला.
दरम्यान, अतिशय भयानक चित्र महाराष्ट्राच्या निवडणुकीत समोर येत आहे हे योग्य नाही. जर बोगस मतदार असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे, जर तसे झाले नाही तर या लोकांचे धाडस आणखी वाढेल. जर यादीतील बोगस मतदारांकडे दुर्लक्ष केले आणि हे लोक मतदान करायला आले तर आम्ही मतदानाच्या दिवशी तिथे उभे राहणार. मग निवडणूक अधिकारी, पोलीस यांच्याशी संघर्षाशी वेळ आली तर तो संघर्ष आम्ही करणार. मात्र हे मतदान होऊ देणार नाही. मुस्लीम मते भाजपाच्या वार्डमध्ये, नगराध्यक्षांच्या घरात आले कसे हा विषय तेवढाच मोठा आहे असंही निलेश राणे यांनी म्हटलं.