शोधायला गेले गुरे अन् सापडली खैराची तस्करी; गोरक्षकांमुळे गुन्हा उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 17:18 IST2025-04-28T17:18:36+5:302025-04-28T17:18:57+5:30
दोडामार्ग : कत्तलीसाठी गुरांची वाहतूक होत असल्याचा संशय आल्याने गोरक्षकांनी पाठलाग करून पकडलेल्या टेम्पोतून खैराची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचा ...

शोधायला गेले गुरे अन् सापडली खैराची तस्करी; गोरक्षकांमुळे गुन्हा उघड
दोडामार्ग : कत्तलीसाठी गुरांची वाहतूक होत असल्याचा संशय आल्याने गोरक्षकांनी पाठलाग करून पकडलेल्या टेम्पोतून खैराची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही वाहतूक करणारा मुख्य आरोपी संदेश नाईक (रा. तळवडे, ता. सावंतवाडी) याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्या व्हाॅट्सॲपवर पिस्तूलासारख्या हत्याराचे विविध व्हिडीओ आढळले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
या प्रकाराची माहिती वनविभागाला दिल्यावर वनकर्मचाऱ्यांनी सर्व मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या मोबाइलमधील व्हाॅट्सॲपवर असलेल्या पिस्तूलच्या व्हिडीओसंदर्भात चौकशी करण्यासाठी आपण पोलिसांना पत्र लिहिणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल वैशाली मंडल यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका टेम्पोमधून कत्तलखान्यात कत्तल करण्यासाठी गायी नेल्या जात असल्याची माहिती दोडामार्गमधील गोरक्षकांना मिळाली होती. त्यांनी याबाबतची माहिती कसई - दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजपा मंडल अध्यक्ष दीपक गवस, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस आदींना दिली. लागलीच गोरक्षकांनी ही गाडी मणेरी येथे अडवून तिची तपासणी केली असता त्यातून बेकायदेशीररीत्या खैराच्या झाडांची वाहतूक होत असल्याचे समोर आले.
याबाबतची माहिती वनक्षेत्रपाल वैशाली मंडल यांना दिल्यावर त्या लागलीच घटनास्थळी दाखल झाल्या. संशयित आरोपी संदेश नाईक यांच्याकडे चौकशी केली असता त्याने इतरही मुद्देमाल दाखविला. त्याचा पंचनामा करून तो वनाधिकाऱ्यांनी जप्त केला व संशयितांवर गुन्हा दाखल केला.
व्हाॅट्सॲपवरील व्हिडीओची चौकशी व्हावी
संशयित आरोपी संदेश नाईक याची दोडामार्ग - बांदा राज्य मार्गाला रोपवाटिका आहे. मात्र, या रोपवाटिकेच्या आड तो खैराच्या झाडांची तस्करी, कत्तलीसाठी गुरांची वाहतूक करत असल्याचा आरोप गोरक्षकांनी केला. त्याच्या व्हाॅट्सॲपवर पिस्तुलाचे वेगवेगळे व्हिडीओ अज्ञात व्यक्तीच्या नंबरवरून आलेले आहेत. त्यामुळे त्याच्या चॅटिंगची आणि त्या व्हिडीओची सखोल चौकशी व्हावी, तो हत्यारांची तस्करी तर करीत नाही ना? याचाही तपास व्हावा, अशी मागणी यावेळी गोरक्षकांनी केली.