Video: आमदार नीलेश राणेंनी केलं 'स्टिंग ऑपरेशन'; भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात पैशांची बॅग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 05:56 IST2025-11-27T05:55:20+5:302025-11-27T05:56:09+5:30
राणे यांनी निवडणूक विभागाच्या पथकाला व मालवण पोलिसांना पाचारण करून कारवाई करण्याच्या सूचना केल्या

Video: आमदार नीलेश राणेंनी केलं 'स्टिंग ऑपरेशन'; भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात पैशांची बॅग
मालवण : नगरपालिका निवडणुकीत राजकीय वातावरण तापले असतानाच बुधवारी सायंकाळी मालवण कुडाळचे आमदार नीलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन केले. राणे यांनी थेट भाजपचे जिल्हा चिटणीस विजय केनवडेकर यांच्या घरात धाड टाकली. यावेळी त्यांच्या घरात मोठी रक्कम सापडली. मात्र, भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी नीलेश राणे यांचे आरोप खोटे असल्याचे सांगितले.
राणे यांनी निवडणूक विभागाच्या पथकाला व मालवण पोलिसांना पाचारण करून कारवाई करण्याच्या सूचना केल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मालवणमध्ये येऊन गेल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांजवळ मोठ्या प्रमाणावर पैसे आल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही रक्कम माझ्या व्यवसायातील आहे. मी बांधकाम व्यावसायिक आहे. माझ्या घरात कोणतीही अनधिकृत रक्कम नाही. विरोधी आमदार यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत, असे विजय केनवडेकर म्हणाले.
प्रदेशाध्यक्षांमुळे युती तुटली नाही
सिंधुदुर्गात युती तुटण्याचे कारण वरिष्ठ पातळीवरील नेतृत्व नाही, तर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत. त्यांना सिंधुदुर्गाबाबत काय राग आहे, ते माहिती नाही. रत्नागिरीत परिस्थिती पाहिली तर राजापूरमध्ये एखादी जागा, लांजात एखादी जागा शिवसेनेशी ताळमेळ झाला. चिपळूण येथेही तशीच परिस्थिती आहे, मग आमच्या सिंधुदुर्गावर राग का, अशी विचारणा निलेश राणे यांनी करत चव्हाणांवर आगपाखड केली होती.
दरम्यान, आम्ही चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांचे काम पाहिले आहे. त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाला किती उंचीवर नेले, हेही आम्ही पाहिले. आपण केवळ दोन-तीन जिल्ह्यांचे राजकारण करू नये, हेच सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता. महायुती का नको याचेही कारण अद्याप समजलेले नाही. हे रवींद्र चव्हाण हेच सांगू शकतील अशी टीका नीलेश राणेंनी केली होती.