Sindhudurg: दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक; चालक, वाहकांसह १९ प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 15:32 IST2025-06-30T15:31:34+5:302025-06-30T15:32:13+5:30
बांदा-पानवळ येथील घटना

Sindhudurg: दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक; चालक, वाहकांसह १९ प्रवासी जखमी
बांदा : बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे दोन एसटी बसमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात १९ प्रवासी जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळच्या सुमारास झाला.
फुकेरी बांदा बस (एमएच-२०-बीएल-२९५७) फुकेरीतुन बांद्याच्या दिशेने येत होती. पानवळ येथे बस आली असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या धाराशिव पणजी बसची (एमएच-१४-एलबी-०७४९) समोरून जोरदार धडक बसली. बस चालकाने ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला मात्र भरधाव वेगात फुकेरी बसला फरफटत नेले. यात बसमधील प्रवाशी, विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. चालक वाहक मिळून एकोणीस जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
चालक व वाहकांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर सुद्धा उपचार सुरु आहेत. एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींची विचारपूस केली. अपघातानंतर वाहतूक कोंडी झाली होती. काही एसटी फेऱ्या उशिरा गेल्याने प्रवाशांचे हाल झाले. सोमवार आठवडा बाजार असल्याने त्याचा सर्वात जास्त फटका बाजारात येणाऱ्यांना बसला आहे. घटनास्थळी बांदा पोलिस हजर झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरु आहे.