Sindhudurg: जमीन संस्थेच्या नावे करण्यासाठी घेतली लाच, उपनिबंधक कार्यालयातील दोन अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 12:23 IST2025-02-05T12:22:57+5:302025-02-05T12:23:23+5:30

सहकार क्षेत्रात मोठी खळबळ

Two officers of the Sub Registrar office caught in the net of bribery in oras Sindhudurg | Sindhudurg: जमीन संस्थेच्या नावे करण्यासाठी घेतली लाच, उपनिबंधक कार्यालयातील दोन अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

Sindhudurg: जमीन संस्थेच्या नावे करण्यासाठी घेतली लाच, उपनिबंधक कार्यालयातील दोन अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

ओरोस : सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे दोन वरिष्ठ अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात सापडले. सिंधुदुर्गचे जिल्हा उपनिबंधक वर्ग १ माणिक भानुदास सांगळे (५६) व कार्यालय अधीक्षक वर्ग ३ ऊर्मिला महादेव यादव या दोघांना ३३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेले. त्यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली.

गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीकामी यातील तक्रारदारांचे स्वामी समर्थ गृहनिर्माण संस्था मर्यादित, रेवतळे, मालवण, जि. सिंधुदुर्ग या गृहनिर्माण संस्थेच्या मानीव अभिहस्तांतरण आदेशाप्रमाणे अंमलबजावणी करून जमीन संस्थेच्या नावे करण्यासाठी ५० हजार रुपये रुपयांच्या लाचेची मागणी करत असल्याची तक्रार १० जानेवारी २०२५ रोजी प्राप्त झाली होती. १६ जानेवारी २०२५ रोजी पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान, संशयित लोकसेविका ऊर्मिला यादव यांनी तक्रारदार यांच्याकडे ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार ४ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात आलेल्या दुसऱ्या पडताळणी कारवाईदरम्यान दोन्ही संशयित लोकसेवक माणिक सांगळे यांनी तक्रारदारांकडे ३३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली तसेच संशयित आरोपी लोकसेविका ऊर्मिला यादव ह्या तक्रारदार यांचेकडे लाच मागणी करत असताना आरोपी लोकसेवक माणिक सांगळे यांनी तेथे हजर राहून लाच मागणीस प्रोत्साहन दिले. मंगळवारी संशयित आरोपी लोकसेविका २ यांनी तक्रारदार यांचेकडून मागणी केलेली ३३ हजार रुपयांच्या लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांच्यासमोर तक्रारदार यांचेकडून स्वीकारताना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले आहे.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

दोन्ही संशयित आरोपींच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. ही कारवाई पोलिस निरीक्षक मनोज जिरगे, पोलिस हवालदार जनार्दन रेवंडकर, रविकांत पालकर, प्रथमेश पोतनीस, विशाल नलावडे, संजय वाघाटे, महिला पोलिस हवालदार समिता क्षीरसागर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Two officers of the Sub Registrar office caught in the net of bribery in oras Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.