वैभववाडी–एडगांव मार्गावर अपघाताची मालिका सुरूच, टेम्पो ट्रॅव्हल्स झाडावर आदळून दोघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 13:16 IST2022-02-05T13:16:09+5:302022-02-05T13:16:29+5:30
वैभववाडी : वैभववाडी–एडगांव मार्गावर दरदिवशी अपघाताची मालिका सुरुच आहे. चार दिवसांत चार अपघात घडले आहेत. आज पहाटेच्या सुमारास याच ...

वैभववाडी–एडगांव मार्गावर अपघाताची मालिका सुरूच, टेम्पो ट्रॅव्हल्स झाडावर आदळून दोघे जखमी
वैभववाडी : वैभववाडी–एडगांव मार्गावर दरदिवशी अपघाताची मालिका सुरुच आहे. चार दिवसांत चार अपघात घडले आहेत. आज पहाटेच्या सुमारास याच मार्गावर आणखी एक अपघात घडला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टेम्पो ट्रॅव्हल्स झाडावर आदळली. एडगाव सर्व्हीसींग सेंटर नजीक हा अपघात घडला. या अपघातात दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
शीतल चप्पा (वय 36) व प्रकाश मंधानिया (33, दोघेही रा. मुंबई) अशी जखमींची नावे आहेत. या ट्रॅव्हल्स मधून एकूण 18 प्रवासी प्रवास करत होते. पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले आहे.
मुंबईहून गोव्याला टेंपो ट्रॅव्हल्स (एमएच 47 वाय 2522) ने निघाले होते. करुळ घाट उतरून गाडी एडगाव येथे आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्यालगत असलेल्या झाडावर जोरदार आदळली. या अपघातात गाडीचे दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातात शीतल चप्पा व प्रकाश मंधानिया हे दोघे जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस हवालदार नितीन खाडे, पो. ना. रमेश नारनवर, पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड हे घटनास्थळी दाखल झाले. एडगांव येथील स्थानिक ग्रामस्थ हेमंत रावराणे, सचिन रावराणे, रवींद्र रावराणे, निलेश रावराणे, रोशन सुतार, बच्चाराम रावराणे यांनी पोलिसांना मदत केली.
पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बाहेर काढत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्या दोघांना कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा तपास वैभववाडी पोलिस करत आहेत.
वैभववाडी ते एडगांव या मार्गावर चार दिवसात चार अपघात घडले आहेत. एडगांव रामेश्वर मंदिर नजीक ट्रक पलटी होऊन अपघात झाला होता. तसेच घाडीवाडीनजीक मनीष ट्रॅव्हल्स ला भीषण आग लागून बस जळून खाक झाली होती. शुक्रवारी एडगांव पुलावरून कार सुखनदी पात्रात कोसळली. सुदैवाने या चारही अपघातात जीवितहानी टळली आहे.