आता कनकनगरी झळकणार कातळचित्रांच्या नकाशावर, तोंडवली येथे पहिल्यांदाच सापडली वैशिष्ट्यपूर्ण कातळचित्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 12:05 PM2024-03-30T12:05:51+5:302024-03-30T12:07:24+5:30

तळेरे : कणकवली तालुक्यातील तोंडवली येथे प्रथमच दोन कातळशिल्पे सापडली असून ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असल्याची माहिती इतिहास संशोधक रणजित ...

two carving sculptures were found for the first time At Tondavali in Kankavali taluka | आता कनकनगरी झळकणार कातळचित्रांच्या नकाशावर, तोंडवली येथे पहिल्यांदाच सापडली वैशिष्ट्यपूर्ण कातळचित्रे

आता कनकनगरी झळकणार कातळचित्रांच्या नकाशावर, तोंडवली येथे पहिल्यांदाच सापडली वैशिष्ट्यपूर्ण कातळचित्रे

तळेरे : कणकवली तालुक्यातील तोंडवली येथे प्रथमच दोन कातळशिल्पे सापडली असून ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असल्याची माहिती इतिहास संशोधक रणजित हिर्लेकर यांनी दिली. यामुळे आता कणकवली तालुकाही जगाच्या नकाशावर झळकणार आहे.

तोंडवली येथील विनोद सुर्यकांत बोभाटे व त्यांचे मित्र दुर्ग संवर्धनाच्या कामात सक्रिय असून आपल्या गावातही पुरातन काही अवशेष सापडतात का? याचा ते शोध घेत होते. त्यांना आपल्या गावातील डोंगरावर काही वैशिष्ट्यपूर्ण पुरातन गोष्टी आढळल्या, पण त्याचा नेमका अर्थ त्यांना उलगडत नव्हता. गेल्याच आठवड्यात मुणगे येथे सापडलेल्या कातळचित्राची बातमी वाचून त्यांनी इतिहास संशोधक रणजित हिर्लेकर यांना केलेल्या फोनमुळे त्यांनी आपले सहकारी अजित टाककर यांच्यासोबत या भागाला भेट दिली आणि या कातळशिल्पाबाबत शिक्कामोर्तब झाले.

यावेळी कणकवली तालुक्यातील नांदगाव आणि तोंडवली या दोन गावांच्या सीमेवर दोन वैशिष्ट्यपूर्ण कातळचित्रे आढळून आली. कोकण इतिहास परिषदेच्यावतीने २६ मार्च रोजी या कातळचित्रांचे सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी कोकण इतिहास परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य रणजित हिर्लेकर यांनी या कातळचित्रांचे छायाचित्रण व त्याची आवश्यक ती मोजमापे घेतली आहेत.

हा एक सरासरी सहा ते सात मीटरचा चौरस आकाराचा कोरलेला पट आहे. याच्या मध्यभागी आग्नेय ते ईशान्य दिशेने एक रेष काढली तर या पटाचे समान दोन भाग दिसून येतात. या रेषेच्या दोन्ही बाजूला समअंगी चित्राप्रमाणे हे कातळचित्र कोरलेले आहे. खेळाच्या पत्त्यांमधील राजाराणी यांची पत्ते डोळ्यासमोर आणा. या पत्त्यामधील हे चित्र पोटाच्या भागी जसे उलटसुलट जोडलेले असते तसे या कातळचित्रात दोन मानवाकृती पोटाच्या भागांमध्ये एकत्र जोडलेले दिसतात. त्यामुळे या कातळचित्राच्या दोन्ही मानवाकृतींच्या पोटाची एकत्रित जोडलेली मध्यभागी असणारी एक समान पट्टी दिसून येते. त्यामुळे गावातील लोकांनी या चित्राला पांडव फळी असे नाव ठेवलेले असावे. या उलटसुलट मानवाकृतीच्या बाजूलाही काही डिझाईन कोरलेली दिसते.

कातळचित्र वेगळ्या प्रकारचे

कोकणात आतापर्यंत सापडलेले चौरस पट पाहता हे चित्र विलक्षण वेगळ्या प्रकारचे आहे, तर दुसऱ्या कातळचित्राचे काम अजून बाकी असून त्याचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्याविषयी माहिती उपलब्ध होऊ शकेल. या शोधमोहिमेत रणजित हिर्लेकर व अजित टाककर यांच्यासमवेत विनोद सूर्यकांत बोभाटे, अभिजित नाना बोभाटे, सुरज संतोष बोभाटे या स्थानिकांनी सक्रिय सहभाग घेतला.

महामार्गाच्या पलीकडे प्रथमच आढळली कातळशिल्पे

याबाबत माहिती देताना रणजित हिर्लेकर म्हणाले की, या प्रकारची कातळशिल्पे प्रथमच आढळली आहेत. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ही शिल्पे असून आतापर्यंत कातळशिल्प महामार्गाच्या अलीकडे म्हणजे समुद्रकिनाऱ्यालगत सापडलेली. तोंडवली येथे प्रथमच महामार्गाच्या पलीकडे ही शिल्पे सापडली आहेत.

Web Title: two carving sculptures were found for the first time At Tondavali in Kankavali taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.