गुरांची वाहतूक; दोघांना अटक, फोंडाघाट येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 12:16 PM2020-01-23T12:16:37+5:302020-01-23T12:20:51+5:30

एका चारचाकी वाहनातून अवैधरित्या सहा गुरांची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीस फोंडाघाट येथील युवकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Transport of cattle; Two arrested in Fondaghat: Two-day police custody | गुरांची वाहतूक; दोघांना अटक, फोंडाघाट येथील घटना

गुरांची वाहतूक; दोघांना अटक, फोंडाघाट येथील घटना

Next
ठळक मुद्देगुरांची वाहतूक; दोघांना अटक, फोंडाघाट येथील घटना दोन दिवसांची पोलीस कोठडी

कणकवली : एका चारचाकी वाहनातून अवैधरित्या सहा गुरांची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीस फोंडाघाट येथील युवकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.या प्रकरणी आणखी एकाला अटक झाली असून पोलिसांनी संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करून सोमवारी कणकवली न्यायालयात त्यांना हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

या घटनेबाबत फोंडाघाट बाजारपेठ येथील विशाल विलास रेवडेकर (३३) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास फोंडाघाट येथील मित्रांसह मी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलो होतो. त्यावेळी माझ्यासोबत सचिन शंकर नाकाडी, मोहन पांडुरंग परूळेकर, तुषार तुकाराम नेवरेकर, रोहित संतोष पारकर हे होते.

आमचे जेवण झाल्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी बाहेर पडलो असता तेथे एक बोलेरो पिकअप टेम्पो (क्रमांक एम. एच. ०९, सीयू ७४९१) हा बंद स्थितीत थांबलेला होता. ती गाडी अधूनमधून हलत असल्याने गाडीच्या हौद्यात पाहिले असता त्यामध्ये गुरे दिसून आली.

त्यामुळे आम्ही चालकाकडे जात असता त्याने गाडी चालू करून निघून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला आम्ही पुढे जाऊन थांबविले. तसेच त्याला गाडीमध्ये काय आहे? असे विचारले असता, त्याने चार बैल व दोन गायी असल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही पोलीस दूरक्षेत्र फोंडा येथील पोलीस हवालदार मुल्ला यांना फोनव्दारे माहिती दिली. त्यांनी रात्री १० वाजण्याच्या दरम्यान येऊन टेम्पो चालकाच्या नाव व गावाची खात्री केली.

त्यावेळी त्याने आपले नाव अमोल आनंदा गोरूले (३२, रा. मुरगुड बाजारपेठ, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे सांगितले. तसेच संबंधित गुरे ही आपण रिजवान रशिद मालिम (रा. तळगाव, मालिगवाडी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) यांच्याकडून आणल्याचे सांगितले.

ती गुरे आपण मुरगुड येथे नेऊन दुसऱ्या गाडीमध्ये भरून कर्नाटक येथे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले, असेही या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी ३ लाख रुपये किमतीची चारचाकी गाडी व १ लाख २० हजार रुपये किमतीची सहा जनावरे ताब्यात घेतली आहेत. तसेच अमोल आनंदा गोरूले व रिजवान रशिद मालिम याच्यावर विविध कलमांद्वारे गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Transport of cattle; Two arrested in Fondaghat: Two-day police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.