वादळी पावसात मालवण समुद्रातील पर्यटन बोटीचे नुकसान, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 13:21 IST2025-05-23T13:20:51+5:302025-05-23T13:21:19+5:30

लाईफ जॅकेट अन् बोटीच्या फळ्याही किनाऱ्यावर

Tourist boat damaged in Malvan sea due to stormy rain | वादळी पावसात मालवण समुद्रातील पर्यटन बोटीचे नुकसान, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

वादळी पावसात मालवण समुद्रातील पर्यटन बोटीचे नुकसान, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मालवण : समुद्रात वादळ स्थिती असून, मुसळधार पाऊस कोसळत आहे. पर्यटन हंगामाच्या सांगतेपूर्वी आलेल्या या वादळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. समुद्रात असलेल्या पर्यटन प्रवासी बोटीचे लाटांच्या तडाख्यात मोठे नुकसान झाले आहे. बोटी सुरक्षित किनाऱ्यावर आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यात पर्यटन व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच बोटीच्या फळ्या आणि बोटीवरील लाईफ जॅकेटही किनाऱ्यावर आली होती.

दरम्यान, मालवणमध्ये २६ मेपासून बंद होणारा पर्यटन हंगाम चार दिवस अगोदर २१ मेपासूनच बंद झाल्यागत जमा झाला आहे. पर्यटन व्यावसायिकांनी आपल्या बोटी सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरूवात केली होती.

तसेच मच्छीमार हंगामही १ जूनपासून बंद होणार असतानाच समुद्रात निर्माण होत असलेल्या वादळी परिस्थितीमुळे प्रशासनाकडून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना करण्यात आल्याने मच्छीमारांनीही आपल्या बोटी सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरूवात केली होती. यामुळे पर्यटन आणि मच्छीमार हंगामाला निसर्गानेच ब्रेक लागल्याची परिस्थिती दिसून येत होती.

मोठ्या संख्येने पर्यटक

मालवण शहरात आजही मोठ्या संख्येने दाखल असलेले पर्यटक किनाऱ्यावर फेरफटका मारताना दिसून येत होते. पर्यटन हंगामाचे काही दिवस शिल्लक राहिलेले असतानाच मुसळधार पाऊस आणि वारे सुरू झाल्याने पर्यटनात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पर्यटकांनाही सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांनीही माघारी फिरणे पसंत केले आहे. तर जलपर्यटन आणि किल्ला होडी सेवाही बंद असल्याने पर्यटकांना किनाऱ्यावरच आनंद घ्यावा लागला होता.

तिसऱ्या दिवशीही वीजपुरवठा खंडित

मालवण शहर व ग्रामीण भागात सलग तिसऱ्या दिवशी काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित होता. व्यापारी आणि पर्यटन व्यावसायिकांना याचा फटका बसला होता, वीज वितरणकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र बिघाड सापडून येत नसल्याने अनेक घरे तीन दिवस अंधारातच होती. वीज वितरणचे दावे मान्सूनपूर्व पावसातच फोल ठरल्याने पुढील चार महिने जाणार कसे, असा संतप्त सवाल उपस्थित होताना दिसत होता.

Web Title: Tourist boat damaged in Malvan sea due to stormy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.