रत्नागिरीसह सिंधुदुर्गात तीन नव्या जेटी उभारणार, मंत्री नितेश राणे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 16:00 IST2025-09-18T16:00:29+5:302025-09-18T16:00:51+5:30

स्थानिकांना रोजगार, व्यवसायाची संधी

Three new jetties will be built in Sindhudurg along with Ratnagiri says Minister Nitesh Rane | रत्नागिरीसह सिंधुदुर्गात तीन नव्या जेटी उभारणार, मंत्री नितेश राणे यांची माहिती

रत्नागिरीसह सिंधुदुर्गात तीन नव्या जेटी उभारणार, मंत्री नितेश राणे यांची माहिती

कणकवली : मत्स्यव्यवसाय व बंदरे खात्याचा कार्यभार नितेश राणे यांच्याकडे आल्यानंतर मासेमारी व्यवसायाबरोबरच पर्यटनात वाढ होण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोकणातील पर्यटन आणि मासेमारी व्यवसायाच्या वाढीसाठी व त्यांना अधिक चालना देण्यासाठी राज्य शासनाने कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील २ व सिंधुदुर्गमधील १ अशा तीन ठिकाणी नव्या जेटी उभारण्यास मंजुरी दिली आहे. तसेच राज्याच्या महाराष्ट्र सागरी प्राधिकरणकडून सीआरझेडविषयी देखील मंजुरी देण्यात आली आहे.

राज्य शासनाने मंजूर केलेल्या तीन जेटींमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील देवाचेगोठणे येथील करंबेळकरवाडी, दापोली तालुक्यातील उटंबर तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पेंडूर याठिकाणी नव्या जेटी उभारण्यात येणार आहेत. कोकणात मासेमारीबरोबर पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा बंदराचा विकास करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नव्याने मंजूर करण्यात आलेल्या या तिन्ही जेटींचे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय प्राधिकरणाकडे पाठविण्यात आले आहेत.

मंत्री नितेश राणे यांनी खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत. मत्स्य व्यवसायाला त्यांनी जल पर्यटनाची जोड दिली आहे. किनारपट्टीवर सोयीसुविधा बळकट केल्या तर त्याचा फायदा होईल, हे लक्षात घेऊन त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोकणच्या किनारपट्टीवर नव्याने जेटी उभ्या राहिल्यास कोकणचा आर्थिक विकास साधला जाणार आहे. मासेमारी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी जेटी अत्यंत महत्त्वाच्या असून, या जेटींमुळे मासेमारी नौका, प्रवासी बोटी आणि रो-रो जहाजे यांना सुरक्षित थांबा मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांची तसेच मालाची वाहतूक अधिक सोयीस्करपणे करता येणार आहे.

स्थानिकांना रोजगार, व्यवसायाची संधी

या तीन नव्या जेटींमुळे कोकणातील किनारपट्टीवरील पर्यटनात वृद्धी होणार असून, पर्यटनातून आर्थिक विकास होण्यास चालना मिळणार आहे. यातूनच स्थानिकांना रोजगार आणि व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. या जेटींच्या माध्यमातून कोकण आणि मुंबई पुन्हा एकदा सागरी मार्गाने जोडले जाऊन यामुळे प्रवास खर्च आणि वेळ दोन्हींची बचत होणार आहे.

Web Title: Three new jetties will be built in Sindhudurg along with Ratnagiri says Minister Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.