Sindhudurg: साळीस्ते खूनप्रकरणी बंगळुरूमध्ये तीन आरोपींना अटक; आज न्यायालयात हजर करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 12:53 IST2025-10-29T12:50:54+5:302025-10-29T12:53:42+5:30
मालमत्तेच्या वादातूनच खून झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष

Sindhudurg: साळीस्ते खूनप्रकरणी बंगळुरूमध्ये तीन आरोपींना अटक; आज न्यायालयात हजर करणार
कणकवली : कणकवली तालुक्यातील साळीस्ते येथे एक मृतदेह २३ ऑक्टोबर रोजी आढळला होता. तो श्रीनिवास रेड्डी (५३, रा.बंगळुरू, कर्नाटक) यांचा असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व कणकवली पोलिसांच्या पथकाने बंगळुरू गाठून तीन संशयित आरोपींना अटक केली. त्यांना आज, बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या खूनप्रकरणी आरोपींची संख्या आणखीन वाढण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
श्रीनिवास रेड्डी यांचा मृतदेह गुरुवारी साळीस्ते येथे महामार्गानजीक गणपती सान्याच्या पायरीवर आढळला होता. तर त्याच दिवशी श्रीनिवास रेड्डी यांच्या आईच्या नावे असणारी कार दोडामार्ग तालुक्यात आढळली होती. त्या कारमध्ये रक्ताचे डाग होते. पोलिस तपासामध्ये मृतदेह व कार यांचा परस्पर संबंध स्पष्ट झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व कणकवली पोलिस अशी दोन पथके तपासासाठी बंगळुरू येथे रवाना झाली होती. ही पथके तिथे आरोपींचा शोध घेत होती.
अखेरीस सोमवारी रात्रीच्या सुमारास तीन संशयित आरोपींना पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले. ते पथक मंगळवारी रात्री कणकवलीत दाखल झाले. सुभाष सुब्बारायप्पा यस (वय ३२), नरसिंम्हा नारायण स्वामी मूर्ती (३६), मधुसूदन सिद्धप्पा तोकला (५२, सर्व रा. बंगळुरू, कर्नाटक) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
या खूनप्रकरणात आणखीन काही जणांचा सहभाग आहे का? हे स्पष्ट होणार आहे. मात्र, सद्यस्थितीत हा खून मालमत्तेच्या वादातूनच झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. तर हा खून साळीस्ते येथेच झाला असावा, आरोपींनी श्रीनिवास रेड्डी यांचा खून केल्यानंतर त्यांचा मृतदेह साळीस्ते येथेच टाकला. तसेच रेड्डी यांच्या ताब्यातील कार दोडामार्ग येथे सोडून ते पळाले असावेत, असाही अंदाज पोलिस सूत्रांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, तपास पथक अद्यापही बंगळुरू येथे ठाण मांडून असून आणखी काही संशयितांना लवकरच अटक होईल, असेही पोलिसांनी सांगितले.