कणकवलीत चोरट्यानी दोन सदनिका फोडल्या, ५ लाखांचा ऐवज लंपास

By सुधीर राणे | Updated: December 11, 2022 13:02 IST2022-12-11T13:01:57+5:302022-12-11T13:02:46+5:30

बांधकरवाडी येथील दत्तकृपा अपार्टमेंटमधील घटना;पाच लाखांचा ऐवज केला लंपास

Thieves broke into two flats in Kankavli, looted 5 lakhs instead | कणकवलीत चोरट्यानी दोन सदनिका फोडल्या, ५ लाखांचा ऐवज लंपास

कणकवलीत चोरट्यानी दोन सदनिका फोडल्या, ५ लाखांचा ऐवज लंपास

कणकवली(सिंधुदुर्ग):  कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील दत्तकृपा अपार्टमेंटमधील जेमतेम काही दिवसांसाठीच बंद असलेल्या दोन सदनिका अज्ञात चोरट्यांनी फोडल्या आहेत. ही घटना रविवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. 

फोडलेल्या सदनिकेमध्ये निवृत्त पोलीस अधिकारी सुरेश लक्ष्मण पवार (६५) यांच्या सदनिकेचा समावेश आहे. त्यांच्या सदनिकेमधून ५ लाख २० हजार रुपये रोकड व चांदीची दोन हजार रुपयांची समई चोरीस गेली. तर अन्य सदनिकेचे मालक हरीश पुरोहीत हे बाहेरगावी असल्याने त्यांचा चोरीस गेलेला मुद्देमाल समजू शकला नव्हता. या घटनेची माहिती समजताच कणकवली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर खंडागळे, हवालदार आर. बी. नानचे यांनी रात्रीच घटनास्थळ गाठले. तसेच पाहणी केली. तर सकाळच्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक व्ही. एम. चव्हाण, महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बरगे, शिपाई सचिन माने यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तत्पूर्वी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र, चोरट्यांचा माग लागू शकला नाही. मागील काही महिने शांत असलेले चोरटे पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने कणकवलीवासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Thieves broke into two flats in Kankavli, looted 5 lakhs instead