निवडणूक लागेल तेव्हा सत्ता नसेल, तेव्हा..; मनसे नेत्याचा नितेश राणेंना सवाल
By सुधीर राणे | Updated: December 15, 2022 19:14 IST2022-12-15T19:04:42+5:302022-12-15T19:14:26+5:30
विधानसभा निवडणुकीतही नितेश राणे मतदारांना मतांसाठी असेच धमकावणार का?

निवडणूक लागेल तेव्हा सत्ता नसेल, तेव्हा..; मनसे नेत्याचा नितेश राणेंना सवाल
कणकवली : माझे मनसे पक्षातील पद टिकवण्याबद्दल सल्ला देण्यापेक्षा आमदार नितेश राणे यांनी यापूर्वी त्यांच्या वडिलांना आम्ही वेळोवेळी दिलेले सल्ले आधी जाणून घ्यावेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक येणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही नितेश राणे मतदारांना मतांसाठी असेच धमकावणार आहेत काय ?असा प्रतिटोला मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी भाजपा आमदार नितेश राणे यांना लगावला.
आमदार म्हणून समानतेने वागण्याची सभागृहात घेतलेल्या शपथेचा विसर नितेश राणे यांना पडला आहे. त्यामुळेच त्यांनी नांदगाव येथे निधीबाबतचे वक्तव्य केले आहे. जेव्हा विधानसभेची निवडणूक लागेल तेव्हा मतदारांना सामोरे जाताना नितेश राणे यांच्याकडे सत्ता नसेल. त्यावेळी ते मतदारांसमोर कोणते वक्तव्य करणार असा सवालही उपरकर यांनी केला.
कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री उपस्थित होते. ग्रामपंचायत निवडणूक प्रचारादरम्यान आमदार नितेश राणे यांनी मतदारांना उद्देशून वक्तव्य केले होते. त्यावर परशुराम उपरकर यांनी टीका टिप्पणी केली होती. त्यानंतर नितेश राणे यांनी त्याला प्रत्युत्तर दिले होते. त्यावरून परशुराम उपरकर यांनी प्रतिटोला लगावला आहे.
ते म्हणाले, नितेश राणेंनी स्वतःचे वडील जेव्हा प्रथम आमदार झाले तेव्हा राज्यात आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार होते हे आधी लक्षात घ्यावे. मग तेव्हा सत्तेत नसलेले व विरोधी आमदार असलेल्या नारायण राणेंनी जिल्ह्याचा विकास केला नाही असे नितेश राणेंना म्हणायचे आहे काय ? हे त्यांनी आधी स्पष्ट करावे.
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरेंना राज्य आणि केंद्रातील अनेक नेते भेटत असतात. त्याप्रमाणेच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरेंची सदिच्छा भेट नितेश राणे यांनी घेतली. त्यामुळे आपले चांगले संबध त्यांच्याबरोबर आहेत असे नितेश राणेंना वाटत असेल. मात्र, त्यांच्या अथवा कोणाच्याच सांगण्याने राज ठाकरे निर्णय घेत नाहीत. हे राणे यांनी लक्षात घ्यावे.