सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्सुकता होती मॉक ड्रिलची; पण..
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 15:58 IST2025-05-08T15:56:03+5:302025-05-08T15:58:17+5:30
सिंधुदुर्गनगरी : केंद्र सरकारने युद्धजन्य परिस्थितीत देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मॉक ड्रिल करण्याचे सर्व राज्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्सुकता होती मॉक ड्रिलची; पण..
सिंधुदुर्गनगरी : केंद्र सरकारने युद्धजन्य परिस्थितीत देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मॉक ड्रिल करण्याचे सर्व राज्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने जिल्ह्यात विविध ठिकाणी मॉक ड्रिलचे नियोजनही करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात मंगळवारी मध्यरात्री भारतीय सैन्यदलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. त्यामुळे मॉकड्रिलच्या अगोदरच ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविल्यामुळे दिवसभर जिल्ह्यात सर्वच ठिकाणी याचीच चर्चा पाहायला मिळाली. शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात मॉक ड्रिल ठरल्याप्रमाणे सायंकाळी ४ ते ४:१५ दरम्यान जिल्ह्याच्या विविध भागांत राबविण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, आरती देसाई, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत, जिल्हा कोषागार अधिकारी मेश्राम आदी उपस्थित होते.
प्रात्यक्षिके उपयोगी पडणार : अनिल पाटील
युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मार्गदर्शन आणि मदत पोहोचविण्यासाठी खबरदारी घेण्याच्या दृष्टीने दक्षता म्हणून आज जिल्हाभरात विविध ठिकाणी एकाच वेळी मॉक ड्रिल घेण्यात आले. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने सादर करण्यात आलेले विविध प्रात्यक्षिकेही सर्वांनाच उपयोगी पडणार असल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मॉक ड्रिलच्या समारोपप्रसंगी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
काय करावे, काय करू नये याबाबत मार्गदर्शन
यावेळी केंद्रीय संरक्षण दल, जिल्हा प्रशासन, पोलिस, आरोग्य, अग्निशमन दल, महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरू युवा केंद्राच्यावतीने आपत्कालीन परिस्थितीमध्ये काय करावे आणि काय करू नये याबाबतचे प्रात्यक्षिके देखील दाखविण्यात आले. दुपारी ४ वाजता मालवण, वेंगुर्ला, कणकवली, देवगड, तिलारी प्रकल्प तसेच ग्रामीण भागात देखील मॉक ड्रिल पार पडले. यात स्थानिक नागरिकांनीही सहभाग घेतला होता.