कणकवली नगरपंचायतीत हायव्होल्टेज ड्रामा; चिठ्ठीने वाचवली सत्ताधाऱ्यांची बाजू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 13:38 IST2026-02-10T13:37:56+5:302026-02-10T13:38:24+5:30
समित्यांच्या निवडीवरून सत्ताधारी-विरोधक भिडले, स्थायी समितीच्या वैधतेवरून पेच कायम, पीठासीन अधिकाऱ्यांचा निर्णय राखीव

कणकवली नगरपंचायतीत हायव्होल्टेज ड्रामा; चिठ्ठीने वाचवली सत्ताधाऱ्यांची बाजू
कणकवली: कणकवली नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती निवडीच्या सभेत आज, मंगळवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. राजकीय गणिते आणि कायदेशीर पेचामुळे ही सभा चांगलीच गाजली. समित्या न नेमण्याचा सत्ताधाऱ्यांचा आग्रह आणि निवडीसाठी विरोधकांनी लावलेला जोर यामुळे सभागृहात तणावाचे वातावरण होते. अखेर समान मते पडल्याने चिठ्ठी टाकण्यात आली, ज्यात नशिबाने सत्ताधाऱ्यांची साथ दिली. मात्र, स्थायी समितीच्या तांत्रिक मुद्द्यावरून सभेचा निर्णय तूर्तास राखून ठेवण्यात आला आहे.
नशिबाचा 'कौल' सत्ताधाऱ्यांच्या बाजूने!
सभेच्या सुरुवातीलाच 'समित्या सध्या नेमू नयेत' असा प्रस्ताव सत्ताधारी गटनेते रुपेश नार्वेकर यांनी मांडला. याला भाजपने तीव्र विरोध दर्शवला. मतदान झाले तेव्हा दोन्ही बाजूला समान मते पडली. सभागृहाची धाकधूक वाढली असताना चिठ्ठी टाकून निर्णय घेण्याचे ठरले. अखेर चिठ्ठीत 'समित्या न नेमण्याचा' निर्णय निघाल्याने सत्ताधारी गटाने सुटकेचा नि:श्वास सोडला, तर विरोधकांचा डाव हुकला.
'स्थायी'वरून तांत्रिक पेच; आता चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात!
विषय समित्यांचा निकाल लागल्यानंतर स्थायी समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, भाजपचे बंडू हर्णे यांनी 'इतर समित्या अस्तित्वात नसल्यास स्थायी समिती अवैध ठरते' असा तांत्रिक मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्यावरून सभागृहात पुन्हा रणकंदन माजले. अखेर पीठासीन अधिकारी गौरी पाटील यांनी तांत्रिक गुंता सोडवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेणार असल्याचे सांगत निर्णय राखून ठेवला.
या सभेला नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, गटनेते रुपेश नार्वेकर, भाजप गटनेत्या सुप्रिया नलावडे यांच्यासह दोन्ही गटांचे सर्व नगरसेवक आणि नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.