भाजपा पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये रोकड सापडल्याने खळबळ; निलेश राणेंचा यंत्रणेवर गंभीर आरोप, म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 14:17 IST2025-12-02T14:16:22+5:302025-12-02T14:17:38+5:30
Local Body Election: गाडी आणि रक्कम ताब्यात, प्रशासन कारवाई करत नसेल तर..

भाजपा पदाधिकाऱ्याच्या कारमध्ये रोकड सापडल्याने खळबळ; निलेश राणेंचा यंत्रणेवर गंभीर आरोप, म्हणाले..
संदीप बोडवे
मालवण: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आचार संहिता भंगाचा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप उर्फ बाबा परब यांच्यावर कलम १७१ नुसार मालवण पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यानच काल, सोमवारी मध्यरात्री पोलिसांच्या भरारी पथकाला छापेमारी करताना भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याच्या गाडीत दीड लाखाची रक्कम सापडली. याप्रकरणी आमदार निलेश राणे यांनी रात्रीत पोलिस ठाणे गाठत भाजप पदाधिकाऱ्यांवर आणि यंत्रणांवर गंभीर आरोप केले. पोलिस तपासात दिरंगाई करत असून एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपा निवडणुकीत पैशाचा वापर करत असल्याचेही राणे पुन्हा म्हणाले.
आमदार निलेश राणे यांनी भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकून लाखांची रोकड पकडल्याने राजकीय रणकंदन माजले असतानाच सोमवारी रात्री प्रचार संपल्यानंतर मालवण पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत रात्री देवगड येथील एका गाडीत लाखो रुपयांची रोकड सापडली. पोलिसांनी गाडीसह, पदाधिकाऱ्यांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आले होते. यावेळी त्यांची चौकशी करण्यासाठी आलेल्या संदीप परब या भाजपा पदाधिकाऱ्यावरही पोलिसांनी वेगळ्या कलमाअंतर्गत कारवाई केली आहे.
..तोपर्यंत येथून हलणार नाही
माहिती मिळताच आक्रमक बनलेल्या आमदार निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांसह मालवण पोलीस ठाणे गाठले. सर्वच पदाधिकारी भाजपाचे असून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी लावून धरली. यापूर्वीच्या प्रकरणात संबंधिताना मी पकडून दिले असताना उलट माझ्यावरच गुन्हा दाखल केलात, मात्र आता या तिन्ही पदाधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, तो पर्यंत मी येथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा राणे यांनी घेतला. मतदानापूर्वी मध्यरात्री घडलेल्या या हायहोल्टेज ड्रामामुळे राजकीय वातावरण आणखी ढवळून निघाले आहे.
प्रशासन कारवाई करत नसेल तर..
आमदार राणे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी सूर्यकांत पाटील यांची त्यांच्या कक्षात भेट घेतली. यावेळी त्यांनी मालवण येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या जवळ सापडेल्या रक्कमांबाबत पुढे काय कारवाई झाली याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. प्रशासन काय कारवाई करत नसेल तर वकिलांशी बोलून न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना प्रतिवादी करणार असल्याचे म्हटले.
उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणाले,
परब यांच्यावर मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 50, 177 आणि भा.न्या दं. 2023 चे कलम 171 अंतर्गत कारवाई केली आहे. परब यांच्या ताब्यातील गाडीला नंबर प्लेट नव्हती आणि गाडीत भाजपाचे चिन्ह असलेला साहित्य सापडले. निवडणूक निर्णय अधिकारी, म्हणाले, सापडेली रक्कम पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतली आहे. त्याचा पोलिसांनी पंचनामा केला असून याप्रमाणे आम्ही जिल्हा संनियंत्रण समितीला कळविले आहे. गाडी पोलिसांच्या ताब्यात आहे.