सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला, महावितरणचे कर्मचारी डागडुजीच्या कामात व्यस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 16:30 IST2025-05-26T16:28:13+5:302025-05-26T16:30:20+5:30
सूर्यनारायणाचे दर्शन घडून आले

संग्रहित छाया
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर कमी आहे. रविवारी सकाळच्या सत्रात काही भागात मोठ्या सरी कोसळल्या तर दुपारनंतर काही भागात सूर्यनारायणाचे दर्शन झाले. सायंकाळी पावसाने थोडी उघडीप दिली होती. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत १५.९ च्या सरासरीने १२७ मिलिमीटर पाऊस पडला आहे.
गेले पाच दिवस मुसळधार पडणाऱ्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नदी-नाले प्रवाहित झाले असून चढणीचे मासे ही दिसत आहेत. मासे मारण्यासाठी शेतजमिनीमध्ये नागरिकांची धावपळ जिल्ह्यात दिसून येत आहे. गेले पाच दिवस झोडपून काढलेल्या पावसाने रविवारी विश्रांती घेतली. सकाळच्या सत्रात जिल्ह्यात काही भागात मोठ्या सरी कोसळल्या. दुपारनंतर काही भागात पाच दिवसांनंतर सूर्यनारायणाचे दर्शन घडून आले.
दरम्यान, दुकानवाड पुलाचे काम अर्धवट राहिल्यामुळे शिवापूर, वसोली, आंजिवडे, दुकानवाड, साकिर्डे अशा गावांना जाण्यासाठी असलेला मार्गच बंद झाला होता. रविवारी दुकानवाड येथील जुना पूल पूर्ववत सुरू करण्यात आला आहे.
वीज यंत्रणा बाधित
- बाधित उपकेंद्रे -१०.
- बाधित उच्चदाब वाहिन्या -२९.
- पडलेले लघुदाब खांब - ७२.
- पडलेले उच्चदाब खांब -२७
- बाधित रोहित्रे - २,४१८.
अपडेट्स मिळवा मोबाइलवर
मोबाइल क्रमांक नोंदणी केलेल्या ग्राहकांना खंडित वीजपुरवठा, वीजबिल व इतर माहिती एसएमएसवर पाठविली जाते. त्यासाठी ग्राहकांनी स्वत:चा मोबाइल क्रमांक महावितरणकडे नोंदविणे आवश्यक आहे. या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा.
४३२ गावे प्रभावित
२,२४१३३ ग्राहक प्रभावित झाले आहेत. काही गावात पर्यायी यंत्रणा वापरून वीज सुरू केली आहे. ग्राहकांचा वीजपुरवठा लवकर सुरू करण्याकरता महावितरण कर्मचारी व अधिकारी अथक परिश्रम घेत, अहोरात्र काम करीत आहेत.
आपत्कालीन संपर्क
जिल्ह्यातील वीज ग्राहक आपत्कालीन कक्षाच्या ७८७५७६५०१९ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. ग्राहक सेवेत हा क्रमांक चोवीस तास सुरू असणार आहे. अशी माहिती महावितरणच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.